वधेराचे सलग दुसरे अर्धशतक, किशनची फटकेबाजी, आरसीबीचा सहा गड्यांनी पराभव, मॅक्सवेल-डु प्लेसिसची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ मुंबई
2023 टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सामनावीर सूर्यकुमार यादवची 237.14 च्या स्ट्राईकरेटने नोंदवलेली वादळी खेळी तसेच नेहाल वधेराचे नाबाद अर्धशतक आणि इशान किशनच्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर यजमान मुंबई इंडियन्सने गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर झेप घेताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 21 चेंडू बाकी ठेवून सहा गड्यांनी दणदणीत पराभव केला.
कर्णधार डु प्लेसिस आणि मॅक्सवेल यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 200 धावांचे आव्हान देताना 20 षटकात 6 बाद 199 धावा जमविल्या. मुंबईच्या बेहरेनडॉर्फने 3 गडी बाद केले. या स्पर्धेतील हा 54 वा सामना होता. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सने 16.3 षटकात 4 बाद 200 धावा जमवित आवश्यक असलेला विजय मिळविला. मुंबईने गेल्या चार सामन्यात तिसऱ्यांदा 200 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. याशिवाय 21 चेंडू बाकी ठेवत आयपीएलमधील सर्वात वेगवान 200 धावांचे टार्गेट गाठण्याचा विक्रम नोंदवला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरकडून विजयासाठी 200 धावांचे आव्हान मिळाले असले तरी मुंबई इंडियन्सने कोणतेही दडपण न घेता आक्रमक फटकेबाजी करण्यावर अधिक भर दिला. कर्णधार रोहित शर्मा अद्याप बॅडपॅचमध्ये वावरत असल्याचे दिसून आले. इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी 28 चेंडूत 51 धावांची भागीदारी सलामीच्या गड्यासाठी केली. हसरंगाने इशान किशनला पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर रावतकरवी झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 42 धावा झळकवल्या. मुंबईला हसरंगाने आपल्या याच षटकातील शेवटच्या चेंडूवर आणखी एक धक्का देताना रोहित शर्माला पायचित केले. त्याने 8 चेंडूत 1 चौकारासह 7 धावा केल्या. मुंबईची यावेळी स्थिती 5 षटकात 2 बाद 52 अशी होती. मुंबईने पॉवरप्ले दरम्यानच्या सहा षटकात 62 धावा जमवताना 2 गडी गमावले.
मुंबईचे पहिले अर्धशतक 27 चेंडूत फलकावर लागले. सूर्यकुमार यादव आणि नेहाल वधेरा यांनी बेंगळूरच्या गोलंदाजीची यथेच्छा धुलाई केली. या जोडीने मुंबईचे शतक 61 चेंडूत फलकावर लावले. तसेच सूर्यकुमार आणि वधेरा यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 32 चेंडूत पूर्ण केली. मुंबई इंडियन्सच्या 150 धावा 82 चेंडूत नोंदवल्या गेल्या. मुंबईच्या या जोडीने तिसऱ्या गड्यासाठीची शतकी भागीदारी 53 चेंडूत नोंदवली. सूर्यकुमारने आपले अर्धशतक 26 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकाराच्या मदतीने पूर्ण केले. डावातील 16 वे षटक विजयकुमार विशाखने टाकले. या षटकातील चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात केदार जाधवकरवी झेलबाद झाला. सूर्यकुमारने 35 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांसह 83 धावा झळकविल्या. यानंतर विशाखने आपल्या या षटकातील पुढील चेंडूवर टीम डेविडला खाते उघडण्यापूर्वी मॅक्सवेलकडे झेल देण्यास भाग पाडले. ग्रीनने पुढील चेंडू खेळून काढत विशाखची संभाव्य हॅट्ट्रिक हुकवली. वधेरा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. वधेराने 34 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 52 तर ग्रीनने नाबाद 2 धावा जमवल्या. मुंबईला अवांतराच्या रुपात 14 धावा मिळाल्या. त्यात 6 वाईड आणि 2 नोबॉलचा समावेश आहे. मुंबईच्या डावात 13 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले. बेंगळूरतर्फे हसरंगा आणि विशाख यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मॅक्सवेल-डु प्लेसिसची फटकेबाजी
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून बेंगळूरला प्रथम फलंदाजी दिली. डावातील पहिल्याच षटकात बेहरेनडॉर्फने विराट कोहलीला केवळ एका धावेवर यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. त्यानंतर बेहरेनडॉर्फने बेंगळूरला आणखी एक धक्का देताना अनुज रावतला 6 धावांवर झेलबाद केले. बेंगळूरची स्थिती यावेळी 2 बाद 16 अशी होती. कर्णधार डु प्लेसिस आणि मॅक्सवेल या जोडीने दर्जेदार फलंदाजी करत तिसऱ्या गड्यासाठी 61 चेंडूत 120 धावांची शतकी भागिदारी केली. बेंगळूर संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 56 धावा जमविताना 2 गडी गमविले.
बेंगळूरचे पहिले अर्धशतक 32 चेंडूत तर डु प्लेसिस आणि मॅक्सवेल यांनी तिसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागिदारी 25 चेंडूत नोंदविली. मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत 25 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. बेंगळूर संघाचे शतक 58 चेंडूत नोंदविले गेले. कर्णधार डु प्लेसिसने अर्धशतक 30 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. या जोडीने शतकी भागिदारी 52 चेंडूत झळकविली. बेहरेनडॉर्फने मॅक्सवेलला वधेराकरवी झेलबाद केले. त्याने 33 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह 68 धावा जमविल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला महिपाल लोमरोर केवळ 1 धाव जमवित कुमार कार्तिकेयच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ग्रीनच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू विष्णू विनोदने डु प्लेसिसला टिपले. त्याने 41 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 65 धावा झळकाविल्या. बेंगळूरची स्थिती यावेळी 14.1 षटकात 5 बाद 146 अशी होती.
दिनेश कार्तिक आणि केदार जाधव या जोडीने 24 चेंडूत 39 धावांची भागिदारी केली. मुंबई संघात पुनरागमन करणाऱ्या जॉर्डनने दिनेश कार्तिकला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30 धावा जमविल्या. मात्र मधवालच्या शेवटच्या षटकामध्ये बेंगळूरला अधिक धावा घेता आल्या नाहीत. केदार जाधवने 10 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 12 तर हसरंगाने 8 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 12 धावा जमविल्या. बेंगळूरच्या डावामध्ये 8 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. बेंगळूरला अवांतराच्या रुपात 4 धावा मिळाल्या. बेंगळूर संघाने 1 ते 6 षटकात 2 बाद 56 धावा, 7 ते 15 षटकात 3 गडी गमवित 96 तर 16 ते 20 षटकात 1 गडी गमवित 47 धावा जमविल्या होत्या. मुंबईतर्फे बेहरेनडॉर्फने 36 धावात 3 तर ग्रीन, जॉर्डन आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : 20 षटकात 6 बाद 199 (कोहली 1, डु प्लेसिस 41 चेंडूत 65, रावत 6, मॅक्सवेल 33 चेंडूत 68, लोमरोर 1, दिनेश कार्तिक 18 चेंडूत 30, केदार जाधव 10 चेंडूत नाबाद 12, हसरंगा 8 चेंडूत नाबाद 12, अवांतर 4, बेहरेनडॉर्फ 3-36, ग्रीन 1-15, जॉर्डन 1-48, कुमार कार्तिकेय 1-35).
मुंबई इंडियन्स 16.3 षटकात 4 बाद 200 (इशान किशन 21 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 42, रोहित शर्मा 8 चेंडूत 7, सूर्यकुमार 35 चेंडूत 7 चौकार, 6 षटकारांसह 83, नेहल वधेरा 34 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 52, डेविड 0, ग्रीन 2 चेंडूत नाबाद 2, अवांतर 14, हसरंगा 2-53, विजयकुमार विशाख 2-37).