प्रतिनिधी,दापोली
Bird News Dapoli : मौजे आंबवली बुद्रुक,ता दापोली येथे सापडलेल्या लाल चोचीचा उष्ण कटीबंधीय (Red Billed Tropic Bird) हा दुर्मिळ पक्षी मनोज केळकर रा. आंबवली बुद्रुक यांना दिसून आला.हा पक्षी भरकटलेल्या अवस्थेत खाडीकीनारी गावात आढळून आला याची माहिती वनविभागास कळताच शुभांगी गुरव, वनरक्षक कोंगळे, प्रतिक बाईत, मनित बाईत, सर्पमित्र आजले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन या लाल चोचीचा उष्णकटीबंधीय पक्षी ताब्यात घेवून वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत सुस्थितीत असल्याची खात्री करुन त्यास मौजे आंगले सुमुद्रकिनारी नैसर्गिक अधिवासात सोडुन मुक्त केले.
लाल चोचीचा उष्ण कटिबंधीय पक्षी हा दुर्मिळ पक्षी असून हा उष्ण कटीबंधीय पक्षी कुटूंबातील आहे.या पक्षाच्या तीन प्रमुख उपप्रजाती आहेत.त्यापैकी भारताच्या समुद्रकिनारी (Phaethona Ethereus) ही उपप्रजाती भारताच्या समुद्रकिनारी आढळून येते. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर (IUCN) यांनी या पक्षांच्या प्रजातीचे वर्गीकरण किमान चिंताजनक म्हणून सुचिबध्द केले आहे. हे पांढ-या रंगाचे उष्ण कटीबंधीय पक्षी तीन उष्णकटीबंधीय पक्षी प्रजातींपैकी सर्वात मोठे आहेत.आणि त्यांची लांबी ९० ते १०० सेंमी आहे.ज्यात ५० सेमी लांब शेपटीचा समावेश आहे.पंखांचा विस्तार सुमारे १०० सेमी आहे.प्रौढ पक्षाचे वजन सुमारे सुमारे ७५० ग्रॅम असते.या पक्षांना कडक किंचीत वक्र लाल रंगाची चोच असते.त्यांचे शरीरावरील पंख हे पांढरे असून टोकाला काळया रंगाचे असतात.
दोन डोळ्यामधुन एक काळी पट्टी जाते. नर पक्षामध्ये लांब शेपटी वगळता नर आणि मादी समान दिसतात. हे किरमीजी रंगाचे उष्णकटीबंधीय पक्षी हे दुर्गम बेटांवर प्रजनन करणारे समुद्री पक्षी आहेत. ते मासे, उडणारे मासे, क्रस्टेशियन्स आणि पाण्याच्या पृष्ठभागावरुन किंवा पाण्यात डुबकी मारुन काढलेले इतर समुद्री जीव खातात. हे उष्णकटीबंधीय पक्षी विरळ वसाहतीमध्ये प्रजनन करतात. घरटयात सामान्यत एकच अंडे असते आणि अंडी उबवण्याचे काम प्रामुख्याने मादी पक्षी करते.
लाल चोचीचा उष्णकटिबंधीय पक्षी हा पक्षी १९६२ आणि १९७२ साली मुंबईच्या किना-यावर मृतावस्थेत सापडलेच्या नोंदी आहेत. हा पक्षी खोल समुद्रात अधिवास करत असून तो सातत्याने उडत असतो. आराम करणेसाठी तो समुद्राच्या पाण्यावर पोहोतो. आणि केवळ प्रजनन हंगामात समुद्रातील बेटांना भेट देतो. महाराष्ट्राच्या किनारपटटीवर या पक्षाची छायाचित्रीत नोंद आजतागायत केवळ सिंधुदुर्गातील वेंगुर्ला रॉक्स च्या खडकावर आहे.