अभयारण्यात आतापर्यंत आठ चित्त्यांचा मृत्यू : आता केवळ 15 शिल्लक
वृत्तसंस्था/ कुनो
मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारी आणखी एका नर चित्त्याचा मृत्यू झाला. मृत झालेल्या चित्त्याचे नाव सूरज असल्याचे सांगण्यात येत आहे. सूरजच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डॉक्टरांचे पथक तपासात गुंतले आहे. कुनो राष्ट्रीय अभयारण्यातील गेल्या चार महिन्यांतील चित्त्याचा हा आठवा मृत्यू आहे. मृतांमध्ये पाच मोठे चित्ते आणि तीन शावकांचा समावेश आहे.
मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात चित्त्यांच्या मृत्यूची प्रक्रिया थांबताना दिसत नाही. मृत नर चित्ता सूरजचे शवविच्छेदन केले जात आहे. त्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण काय हे स्पष्ट होईल. तथापि, आतापर्यंत मृत झालेल्या चित्त्यांबाबत केवळ वातावरणातील बदल हे कारण पुढे केले जात आहे. याबाबत वनविभागाचे अधिकारी नेमके कारण सांगण्यास नकार देत आहेत. प्रत्येक वेळी व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अलीकडेच मंगळवारी कुनो अभयारण्यात तेजस नावाच्या नर चित्ताचा मृत्यू झाला होता. मादी बिबट्याशी झालेल्या हिंसक झटापटीत तो जखमी झाल्याचा दावा केला जात होता.
17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील आठ चित्ते सोडले. नामिबियातून 8 आणि दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले. यासोबतच मादी चित्त्याने तीन पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी सर्व पिल्ले मरण पावली आहेत. आता कुनो नॅशनल पार्कमध्ये 15 चित्ते शिल्लक आहेत.