आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र सरकारने अचानकपणे 5 टक्के जीएसटी लागू केला. यामुळे जीवनावश्यक वस्तू पुन्हा महाग होणार आहेत. काही वस्तुंवरील जीएसटी कमी करण्याचे जाहीर करण्यात आले तरी अन्न-धान्य आणि जीवनावश्यक वस्तुंवरील पूर्ण जीएसटी कमी करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे बेकारी वाढली आहे. यातच आता पुन्हा जीएसटीसारखा जाचक कर आकारून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. दूध, दही तसेच इतर कृषी उत्पादनावरील जीएसटी पूर्णपणे कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जीएसटी पूर्णपणे कमी केला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजकुमार टोपण्णावर, शंकर हेगडे, संजय काकतकर, समीर सय्यद, फैयाज सौदागर, एम. के. सय्यद, ए. एम. सनदी, अस्लम पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.