पोलीस बंदोबस्ताचीही मागणी; येळ्ळूर ग्रा. पं. सदस्यांचे विविध खात्यांना निवेदन
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला सोमवार दि. 25 पासून प्रारंभ होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे यात्रेवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यावषी ही यात्रा मोठय़ा उत्साहात होणार असून बससेवा अधिक द्यावी, विद्युतपुरवठा सुरळीत करावा. याचबरोबर पोलिसांनीही बंदोबस्त ठेवावा, यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्यावतीने पोलीस अधिकाऱयांसह हेस्कॉम आणि केएसआरटीसीच्या अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
सोमवार दि. 25 पासून 28 एप्रिलपर्यंत ही यात्रा होणार आहे. सोमवार दि. 25 रोजी आंबील-गाडे, मंगळवार दि. 26 रोजी सकाळी मजल (बैलजोडींची मिरवणूक), संध्याकाळी श्री चांगळेश्वरी व कलमेश्वर मंदिरासमोर इंगळय़ांचा कार्यक्रम, बुधवार दि. 27 रोजी श्री लक्ष्मीचा वाढदिवस आणि गुरुवार दि. 28 रोजी येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रोत्सवाला भाविक मोठय़ा संख्येने येणार आहेत. त्यामुळे गावात पोलीस बंदोबस्त ठेवून ही यात्रा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करावे, अशी मागणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक श्रीनिवास हंडा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यात्रोत्सव काळात अतिरिक्त बसेस सोडाव्यात यासाठी केएसआरटीसीचे अधिकारी शिरगुप्पीकर यांनाही निवेदन देण्यात
आले.
यात्रोत्सव काळात विद्युतपुरवठा सुरळीत ठेवावा. कोणत्याही परिस्थितीत विद्युतपुरवठा खंडित होऊ नये याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. यासाठी हेस्कॉमचे ग्रामीण विभाग साहाय्यक अभियंता प्रशांत टिपगी यांना निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, राजू डोण्यान्नावर, परशराम परीट, पुंडलिक तळवार आदी मंडळी उपस्थित होती.