खासदार इराण्णा कडाडी यांनी मागितली भरती प्रक्रियेची माहिती : अधिकारी अनुत्तरित : गैरप्रकार झाला नसल्याचा कांगावा
बेळगाव ; कॅन्टोन्मेंट भरती प्रक्रियेत आतापर्यंत निवड झालेल्या उमेदवारांची माहिती सादर करण्याची सूचना खासदार इराण्णा कडाडी यांनी केली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांना माहिती देण्यास अपयश आले. यावर खासदार समाधानी झाले नसल्याने कोणत्या उमेदवारांची आपण निवड केली आहे, याची माहिती मिळणे आवश्यक असून माहिती सादर करावी, अशी सूचना केली. कॅन्टोन्मेंटची सर्वसाधारण सभा बुधवारी आयोजित केली होती. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवेळी कॅन्टोन्मेंट कामगार भरती प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कॅन्टोन्मेंट कार्यालयातील विविध पदे भरण्याची प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सदर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यामुळे खासदार इराण्णा कडाडी यांनी या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. आतापर्यंत निवड केलेल्या उमेदवारांबाबत तक्रारी वाढल्या आहेत. या भरती प्रक्रियेत गैरकारभार झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे कोणत्या निकषांवर कर्मचारी भरती करण्यात आली, याची माहिती सादर करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांना केली. नियमानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे के. आनंद यांनी सांगितले. यामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
कोणत्या निकषांवर निवड केल्याची माहिती द्या
य् ाा उत्तरावर आपण सहमत नसल्याचे खासदार कडाडी यांनी स्पष्ट केले. नागरिक तक्रार करीत असून याबाबत लेखी तक्रारदेखील संरक्षण खात्याकडे करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमातूनदेखील याबाबत वृत्त प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे कोणत्या निकषांवर निवड केली, याची माहिती मिळणे गरजेचे असल्याचे कडाडी यांनी सांगितले. पण अधिकाऱ्यांना यावेळी उत्तर देता आले नाही. नियमानुसार व शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांची निवड केली आहे. प्रथम लेखी परीक्षा त्यानंतर सामान्यज्ञान परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची निवड केल्याचे के. आनंद यांनी सांगितले. स्वच्छता कामगारांची निवड कोणत्या शैक्षणिक पात्रतेनुसार केली आहे, याची माहिती मला हवी. ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांची शैक्षणिक पात्रता आणि निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय आहे, याबाबत सविस्तर माहिती सादर करा, अशी सूचना खासदार कडाडी आणि आमदार बेनके यांनी बैठकीत केली. य् ााबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली. भरती प्रक्रियेचा मुद्दा चांगलाच तापला असून संरक्षण खात्यापर्यंत याबाबत तक्रारी गेल्या आहेत. याबाबत चौकशीदेखील सुरू आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, नियमानुसारच भरती झाली असल्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी केला.