14 दिवसांच्या तपासानंतर खुलासा : जगभरातील अंतराळ संस्थांशी साधला संपर्क
वृत्तसंस्था/ कॅनबरा
17 जुलै रोजी ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेल्या एका रहस्यमय तुकड्याने सर्वांना चकित केले होते. हा तुकडा म्हणजे भारतीय रॉकेटच्या अवशेषांपैकी एक असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेने सोमवारी स्पष्ट केले आहे. तिसऱ्या टप्प्यावर वेगळा झालेला पीएसएलव्ही लाँच व्हेईकलचा हा हिस्सा असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
संबंधित अवशेषांच्या तपासणीत ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेला 2 आठवड्यांचा कालावधी लागला आहे. यापूर्वी हा तुकडा हेरगिरी उपकरण आणि बेपत्ता एमएच370 विमानाचा हिस्सा असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तर इस्रोने याप्रकरणी आतापर्यंत कुठलीच माहिती दिलेली नाही.
सध्या 2 मीटर उंचीच्या तुकड्याला स्टोरेजमध्ये ठेवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतराळ कराराच्या अंतर्गत भारत देखील याच्या तपासात सहकार्य करत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेने म्हटले आहे.
रॉकेटचा हिस्सा समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेल्या दिवशी ऑस्ट्रेलियन अंतराळ संस्थेने याचे छायाचित्र ट्विट केले होते. तसेच ज्युरियन बे, पश्चिम ऑस्ट्रेलियात आढळून आलेल्या या वस्तूप्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत. हा एखाद्या विदेशी अंतराळ प्रक्षेपकाचा हिस्सा असू शकतो असे म्हटले गेले होते. या तुकड्याला स्पर्श न करण्याचा सल्ला अंतराळ संस्थेने लोकांना दिला होता. तसेच अशाप्रकारची आणखी वस्तू आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ऑफिस फॉर आउटर स्पेस ट्रीटी अंतर्गत एखाद्या देशात अन्य देशाचे स्पेस ऑब्जेक्ट कोसळल्यास ते चौकशीनंतर परत करावे लागते. तसेच याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाला कळवावी लागते. युएनओओएसए अशाप्रकारे आढळून आलेल्या स्पेस ऑब्जेक्ट्सची एक यादी स्वत:कडे तयार करत असते. ऑफिस फॉर आउटर स्पेस ट्रीटीवर 13 डिसेंबर 1958 रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती. अंतराळाशी निगडित माहितींवरून सर्व देशांदरम्यान ताळमेळ राखता यावा याकरता हा करार करण्यात आला होता.