पंतप्रधान संग्रहालय असणार नवे नाव : काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील नेहरू मेमोरियलचे नाव आता बदलण्यात आले आहे. नेहरू मेमोरियलला आता पंतप्रधान संग्रहालयाच्या नावाने ओळखले जाणार आहे. नेहरू मेमोरियलचे नाव बदलण्याच्या निर्णयावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हा निर्णय म्हणजे संकुचित मानसिकतेचा परिपाक आहे. स्मारकावरील नेहरूंचे नाव हटवू शकाल, परंतु लोकांच्या मनातील नेहरूंचे स्थान कसे मिटविणार असे प्रश्नार्थक विधान काँग्रेसने मोदी सरकारला उद्देशून केले आहे. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.
देशाच्या भागीदारीत प्रत्येक रंग दिसणे आवश्यक आहे. देशाच्या सर्व पंतप्रधानांचे योगदान आम्ही दर्शवू इच्छितो. लोकशाही व्यवस्थेच्या अंतर्गतच हे नाव बदलण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
नेहरू मेमोरियलचे नाव बदलत एका व्यक्तीने पुन्हा एकदा स्वत:ची संकुचित मानसिकता दाखवून दिली असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली आहे. वल्लभ यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची एक ओळ ‘छोटे मन से कोई बडा नहीं बन सकता’चा उल्लेख केला आहे.
इतरांची नावे मिटवून स्वत:ला मोठे करू पाहणाऱ्याला देशाचे लोक महान मानू शकत नाहीत. मागील 59 वर्षांपासून मेमोरियल लायब्रेरी सुरू आहे. या वाचनालयातून ज्ञान प्राप्त करत लोक पुढील पिढीला ते प्रदान करत होते. 140 कोटी लोकांच्या मनात पंडित नेहरूंचे नाव कोरले गेले आहे, हे स्थान मोदी सरकार कसे हटविणार? भाजपच्या या कृत्यामुळे उलट पंडित नेहरूंच्या कीर्तिला अधिकच झळाळी मिळणार आहे. पंडित नेहरू हे भारताचे शिल्पकार असून आगामी 1 हजार वर्षांपर्यंत त्यांनाच शिल्पकार मानले जाईल असा दावा काँग्रेस प्रवक्त्याने केला आहे.
राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली निर्णय
तत्पूर्वी केंद्र सरकारकडून नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्रेरी सोसायटीचे नाव बलण्याचा निर्णय एका विशेष बैठकीनंतर घेण्यात आला होता. याचे नाव पंतप्रधान संग्रहालय आणि सोसायटीत (पीएमएमएस) असे करण्याचा संकल्प घेण्यात आला होता. विशेष बैठकीचे अध्यक्षत्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले असून ते सोसायटीचे उपाध्यक्ष देखील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्व पंतप्रधानांकडून राष्ट्राचे रक्षण, विकासात करण्यात आलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी नवी दिल्लीत ‘पंतप्रधान संग्रहालया’ची स्थापना केली आहे. हे संग्रहालय भारताच्या विकास यात्रेला प्रतिबिंबित करते आणि देशाच्या लोकशाहीच्या यशाची कहाणी सादर करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
संस्थेचे स्वरुप
नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्रेरी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत होती. दिल्लीच्या तीन मूर्ती मार्गावर ही संस्था असून तेथे पत्रकार, लेखक, संशोधक नेहरूंच्या काळातील धोरणे अन् समकालीन स्थितीबद्दल पुस्तके वाचण्यासाठी येत असतात.
संस्थेचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी
पंतप्रधान संग्रहालय आणि सोसायटीत एक अध्यक्ष आणि 29 सदस्य आहेत. सोसायटीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असून 29 सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी , अनुराग ठाकूर यांच्यासमवेत अनेक जण सामील आहेत. देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांचा कार्यकाळ, तत्कालीन सरकारची प्रगती आणि अन्य घडामोडींना प्रतिबिंबित करण्यासाठी हे संग्रहालय आहे.