मडगाव पालिकेला 3.82 कोटी खर्च अपेक्षित
प्रतिनिधी /मडगाव
गेल्या आठवडय़ात सोनसडा कचरा प्रकल्पाच्या शेडची भिंत कोसळल्यानंतर, मडगाव पालिका भिंतीच्या दुरुस्तीसाठी आणखी एक निविदा काढण्याची योजना आखत आहे, तर दुसरीकडे दशकभर जुन्या शेडच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पालिकेला 3.82 कोटी रु. खर्च अपेक्षित आहे. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी घेतलेल्या संरचनात्मक स्थिरता चाचणीनंतर मुख्याधिकारी रोहित कदम यांनी सांगितले की, कचरा व्यवस्थापन करणाऱयांसाठी जागा सुरक्षित बनविण्याच्या दृष्टीने पालिका शेड आणि भिंतीची दुरुस्ती करेल.
कदम पुढे म्हणाले की, पालिका उपाययोजनेच्या अंतर्गत शेडमध्ये साचलेला कचरा काढून टाकण्याचे काम करत आहे, जेणेकरून प्रकल्प शेडमध्ये कचरा प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने नियुक्त केलेला कंत्राटदार शेडमध्ये साचलेल्या कचऱयाचे निराकरण करण्याच्या कामावर आहे. कचऱयाचे ढिगारे शेडमधून हटविल्यानंतर, शहरात दररोज निर्माण होणाऱया कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका एका कंत्राटदाराची नियुक्ती करेल. शहरात दररोज सुमारे 38 ते 40 टन ओला कचरा निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सोनसडा कचरा यार्डला दिलेल्या भेटीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार घनकचरा व्यवस्थापनाने सोनसडय़ावर प्रत्येकी 25 टन क्षमतेच्या दोन बायोडायजेस्टरची स्थापना करेपर्यंत कंत्राटदाराच्या मदतीने दैनंदिन कचऱयावर प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. मुख्याधिकाऱयांनी सोनसडा कचरा व्यवस्थापन शेडचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठवला असल्याचे स्पष्ट केले आहे.