नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर कवळेकर यांच्या हस्ते प्रारंभ
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने शहरी भागातील सडेकर लेन पॅसेज तसेच सालसेत फार्मसीनजीकची पॅसेज कचरामुक्त ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. सडेकर लेन येथे पूर्वीप्रमाणे एक कायमची रिक्षा कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आली असून स्थानिक नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर कवळेकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
सडेकर लेन येथे बाजारपेठेतील तसेच सभोवतालच्या परिसरांतील आणि बाहेरून आणून लोक कचरा टाकत असत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱयांना कचऱयातून वाट काढत आणि दुर्गंधीमुळे नाकाला धरून जावे लागत असल्याची कैफियत नगरसेविका डॉ. रोनिता यांनी वेळोवेळी पालिका बैठकीत व संबधितांकडे मांडली होती.
नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी रोहित कदम तत्परतेने कामे करत असून त्यांनी सदर शहरी भाग स्वच्छ राहावा यासाठी पूर्वीप्रमाणे रिक्षा ठेवण्यास मंजुरी देऊन प्रत्यक्षात कृती केल्याबद्दल नगरसेविका डॉ. रोनिता यांनी मुख्याधिकारी तसेच सॅनिटरी विभागाचे आभार मानले आहेत.
सदर सडेकर लेन पॅसेजच्या ठिकाणी सध्या रिक्षासह दोन कामगार ठेवण्यात आले आहेत. कोणी रिक्षा वगळता अन्य भागात कचरा फेकणार नाही याची काळजी घेताना या पॅसेजमध्ये पाणी फवारणी करून स्वच्छता राखण्याचे काम ते करतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र आजगावकर, अश्रफ पंडियाल, सॅनिटरी निरीक्षक उपस्थित होते.