पणजी क्राईम पोलिसातर्फे कारवाई
प्रतिनिधी /फोंडा
बेतोडा-फोंडा येथे सर्रास सुरू असलेल्या (मिनी कॅसिनो) जुगार अडय़ावर क्रॉईम खात्याच्या पोलिसांनी धाड टाकून लॅपटॉप, रोख 50 हजार रूपयासह चौघाजणांना अटक केली आहे. सरोज कुमार साकिचंद शाह (33,कुंकळय़े सासष्टी), सतीश कैलाश राजपूत (34,कुंकळय़े सासष्टी), उल्हास कृष्णा सावंत (30, रा. बेतोडा) व सीब भास्कर भुयान (34, ओरीसा) अशी संशयितांची नावे आहेत. मंगळवार 7 जून रोजी उशिरा रात्री ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेतोडा येथील गीता बार जवळील एका दुकानात संगणकावर मिनी कॅसिनो म्हणून परिचित असलेला जुगार अड्डा मागील काही दिवसापासून कार्यरत असल्याच्या ग्रामस्थाच्या तक्रारी पोलीसांना आल्या होत्या. बेतोडा आऊट पोस्टवरील पोलीसांनी या जुगार अड्डय़ावर कानाडोळा केला होता. शेवटी पणजी येथील क्राईम खात्याच्या पोलिसांनी धाड टाकून लॅपटॉप, संगणक स्क्रीन, रोख 50 हजार रूपये जप्त करण्यात आले. यापुर्वी फोंडा पोलिसांनी तीन पत्ती जुगार अड्डय़ावर धाड टाकून पाचजणांना अटक केली होती. घटनेच्या काही दिवसांनी मिनी कॅसिनोवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. क्राईम खात्याचे पोलीस उपनिरीक्षक मार्लन डिसौझा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश देसाई, इर्शाद वाटंगी, शांताकुमार गुडलंगरी यांनी ही कारवाई केली.