दिल्ली कॅपिटल्सचा 6 गड्यांनी विजय, जोनासेन सामन्यात सर्वोत्तम
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी येथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सहा गड्यांनी पराभव केला. दिल्लीच्या जेस जोनासेनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
सोमवारचा हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला पण दिल्ली कॅपिटल्सने दोन चेंडू बाकी ठेवून आपला विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 20 षटकात 4 बाद 150 धावा जमवल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 19.4 षटकात 4 बाद 154 धावा जमवत हा सामना जिंकला. या विजयामुळे दिल्लीने स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळवताना 8 गुण नोंदवले. त्यांनी आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. तर बेंगळूरचा संघ अद्याप या स्पर्धेत आपल्या विजयाचे खाते उघडले नाही. त्यामुळे हा संघ या पहिल्याच स्पर्धेत बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या डावामध्ये इलेसी पेरीने 52 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 67 तर रिचा घोषने 16 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 37, सोफी डिव्हाईनने 19 चेंडूत 3 चौकारासह 21, नाईटने 12 चेंडूत 1 चौकारासह 11, श्रेयांका पाटीलने नाबाद 4 तर कर्णधार स्मृती मानधनाने 15 चेंडूत 1 चौकारासह 8 धावा जमवल्या. स्मृती मानधना या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून फलंदाजीचा सूर मिळवण्यासाठी झगडत आहे पण तिला अद्याप यश आलेले नाही. एलीस पेरी आणि रिचा घोष यांनी चौथ्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी केल्याने बेंगळूर संघाला 150 धावापर्यंत मजल मारता आली. बेंगळूरच्या डावात 8 षटकार आणि 12 चौकार नोंदवले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे शिखा पांडेने 23 धावात 3 तर तारा नोरीसने 25 धावात एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. बेंगळूरच्या शूटने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर शेफाली वर्माचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडवला. त्यानंतर कर्णधार लॅनिंग आणि कॅप्से यांनी दुसऱ्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी केली. प्रिती बोसने कॅप्सेला झेलबाद केले. तिने 24 चेंडूत 8 चौकारासह 38 धावा जमवल्या. आशाने लॅनिंगला नाईटकरवी झेलबाद केले. तिने 18 चेंडूत 1 चौकारासह 15 धावा जमवल्या. कॅप्से आणि रॉड्रीग्ज यांनी तिसऱ्या गड्यासाठी 25 धावांची भर घातली. लॅनिंग बाद झाल्यानंतर रॉड्रीग्ज आणि कॅप यांनी चौथ्या गड्यासाठी 39 धावांची भागीदारी केली. आशाने रॉड्रीग्जला घोषकरवी झेलबाद केले. तिने 28 चेंडूत 3 चौकारासह 32 धावा जमवल्या. दिल्लीची यावेळी स्थिती 14.3 षटकात 4 बाद 109 अशी होती. कॅप आणि जोनासेन यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 45 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला दोन चेंडू बाकी ठेवून विजय मिळवला. कॅपने 32 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 32 तर जोनासेनने 15 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 29 धावा जमवल्या. दिल्लीच्या डावामध्ये 2 षटकार आणि 19 चौकार नोंदवले गेले. बेंगळूरतर्फे शोभना आशाने 2 तर मेगन शूट आणि बोस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दिल्लीच्या जोनासेन आणि कॅप यांनी शानदार अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडवले. जोनासेनने डावातील विसाव्या आणि शेवटच्या षटकात रेणुका सिंग ठाकुरच्या गोलंदाजीवर 1 षटकार आणि 1 चौकार ठोकून दिल्लीला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकात 4 बाद 150 (स्मृती मानधना 8, डिव्हाईन 21, पेरी नाबाद 67, नाईट 11, घोष 37, श्रेयांका पाटील नाबाद 4, अवांतर 2, शिखा पांडे 3-33, नोरीस 1-25), दिल्ली कॅपिटल्स 19.4 षटकात 4 बाद 154 (लॅनिंग 16, शेफाली वर्मा 0, कॅप्से 38, रॉड्रीग्ज 32, कॅप नाबाद 32, जोनासेन नाबाद 29, अवांतर 8, शोभना आशा 2-27, मेगन शूट 1-24, बोस 1-12).