कोस्ट्युकच्या कृतीला समर्थन, वायमर, कोबोली, ब्राँझेटी पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
ट्युनिशियाच्या ऑन्स जेबॉरने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची सुरुवात निर्दोष खेळाने करीत महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या जेबॉरने इटलीच्या बिगरमानांकित लुसिया ब्राँझेटीचा पराभव केला. अन्य सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडने वायमरचा पराभव करून दुसरी फेरी गाठली तर कार्लोस अल्कारेझ व कोको गॉफ यांनीही दुसरी फेरी गाठली.
जेबॉरने ब्राँझेटीचा 6-4, 6-1 असा सहज पराभव केला. या मोसमात जेबॉरला गुडघेदुखीवर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली तर पोटरीच्या दुखापतीमुळे तिला माद्रिद ओपनला मुकावे लागले होते. मात्र येथे खेळताना ती शानदार फॉर्ममध्ये दिसून आली. ब्राँझेटीने अलीकडेच रबात येथे झालेल्या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. पण येथे तिचा जेबॉरसमोर टिकाव लागला नाही. जेबॉरने गेल्या वर्षी विम्बल्डन व यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली होती. दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफला स्पेनच्या रिबेका मासारोव्हावर विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. सहाव्या मानांकित गॉफने ही लढत 3-6, 6-1, 6-2 अशी जिंकत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. मागील वर्षी गॉफने येथे उपविजेतेपद मिळविले होते. मासारोव्हा जागतिक क्रमवारीत 71 व्या स्थानावर आहे.
यास्त्रेम्स्काचे कोस्ट्युकला समर्थन
युक्रेनच्या डायाना यास्त्रेम्स्काला क्रोएशियाच्या डोना व्हेकिककडून 2-6, 5-7 असा पराभव स्वीकारावा लागला. बेलारुसच्या साबालेन्काने युक्रेनच्या कोस्ट्युकचा पराभव केल्यानंतर कोस्ट्युक साबालेन्काशी शेकहँड न करताच निघून गेली, तेव्हा प्रेक्षकांनी तिची टर उडविली. मात्र यास्त्रेम्स्काने आपल्या देशवासी कोस्ट्युकचे समर्थन केले आहे. ‘टेनिस स्पर्धा कुठलीही असो, रशिया किंवा बेलारुसचा प्रतिस्पर्धी खेळाडू असेल तर आम्ही त्यांच्याही कधीही शेकहँड करणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांची प्रतिक्रिया योग्य नव्हती. आमची भूमिकाच आम्ही या कृतीतून व्यक्त करीत असतो, हे सर्वांना माहित आहे, त्यात आश्चर्य असे काहीच नाही,’ असे यास्त्रेम्स्का म्हणाली.
रुड विजयी
पुरुष एकेरीत नॉर्वेच्या चौथ्या मानांकित कॅस्पर रुडने आरामात दुसरी फेरी गाठताना स्वीडनचा क्वालिफायर इलियास वायमरचा 6-4, 6-3, 6-2 असा पराभव केला. सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा रुडचा प्रयत्न आहे. ‘गेल्या वर्षी माझे चांगले प्रदर्शन झाले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याचा माझा यावेळीही प्रयत्न असेल. गेल्या वर्षीचे जेतेपद राखण्याचा प्रत्येकजणच प्रयत्न करीत असतो आणि माझाही तोच प्रयत्न असेल,’ असे रुड म्हणाला. वायमर हा त्याची जोड ठरू शकला नाही. रुडच्या जबरदस्त बेसलाईन फटक्यांसमोर त्याचा टिकाव लागू शकला नाही आणि त्याच्याकडून अनेक चुका झाल्या. दुसऱ्या मॅचपॉईंटवर रुडने सामना संपवला.
अल्कारेझ दुसऱ्या फेरीत
अन्य एका सामन्यात जागतिक अग्रमानांकित कार्लोस अल्कारेझने पात्रता फेरीतून आलेल्या फ्लॅव्हिओ कोबोलीवर 6-0, 6-2, 7-5 अशी मात करून दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. 20 वर्षीय स्पेनच्या अल्कारेझला टेनिसमध्ये नदालचा वारसदार मानले जात आहे. दुखापतीमुळे त्याला ऑस्टेलियन ओपन स्पर्धा हुकली होती. गेल्या वर्षी यूएस ओपन जिंकल्यानंतर यावेळी येथे शानदार विजय मिळवित इतरांना त्याने इशाराच दिला आहे.