निफ्टी 18,600 च्या टप्प्यावर : आयटीसीमध्ये 2 टक्क्यांची तेजी
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात तेजी राहल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारले. यामध्ये सेन्सेक्स 122 अंकांनी तर निफ्टी 35 अंकांनी वधारले आहेत.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीसोबत बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 122.75 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 62,969.13 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 35.20 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.19 टक्क्यांच्या कामगिरीसोबत 18,633.85 वर बंद झाला आहे. निफ्टीमधील आयटीसीचे समभाग हे सर्वाधिक 2.35 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत.
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी
शेअरबाजारात मंगळवारी वाहन, ऊर्जा, औषध आणि धातू या क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव राहिल्याचे दिसून आले. तसेच बँक, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये लिलावाची नोंद करण्यात आली आहे. तसेच बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांक हलक्या तेजीसोबत बंद झाले आहेत.
सेन्सेक्समध्ये आयटीसीचे समभाग हे सर्वाधिक 2.31 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये बजाज फिनसर्व्ह 1.08, कोटक महिंद्रा बँक 1.07 टक्के आणि बजाज फायनान्सचे समभाग 1.02 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, इन्फोसिस, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एशियन पेन्ट्स, एचडीएफसी आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग वधारले आहेत.
दुसऱ्या बाजूला टेक महिंद्राचे समभाग 1.27 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले असून टाटा स्टील, सनफार्मा आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग हे सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. यासह लार्सन अॅण्ड टुब्र्रो, टाटा मोर्ट्स, टायटन, स्टेट बँक, भारती एअरटेल, टीसीएस आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.