मतदानदिनीच विवाह मुहूर्त : आधी मतदान नंतर लग्न
बेळगाव : एकीकडे यात्रा-जत्रा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे, तर दुसरीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे लगीनघाईत निवडणुकीची रणधुमाळी असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. दि. 10 मे रोजी मतदान होणार आहे आणि या दिवशी लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे वर-वधू प्रथमत: मतदानाचा हक्क बजावणार की मुहूर्तानंतर मतदान करणार, हे पाहावे लागणार आहे. मे महिन्यात 7, 9, 10, 11, 12, 15, 16, 21, 29 आणि 30 रोजी लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे वेळेवर मुहूर्त साधण्यासाठी वधू-वर कुटुंबीयांची धडपड सुरू झाली आहे. त्यातच निवडणुकीची रणधुमाळीही सुरू आहे. गावोगावी प्रचाराला वेग आला आहे. योगायोगाने 10 मे रोजी मतदानादिवशीच लग्नाचा मुहूर्त आहे. आधी मतदानाचा हक्क आणि नंतर लग्नाचा मुहूर्त याप्रमाणे काही वर-वधू प्रथमत: मतदानाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. लग्नसराई, यात्रा-जत्रा आणि प्रचाराचा जोर यामुळे गावे आवाजाने घुमू लागली आहेत. वधू-वर, पालकांची लग्नासाठी धडपड सुरू आहे. दुसरीकडे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची प्रत्येक घरापर्यंत जाऊन मतयाचनेसाठी वर्दळ वाढली आहे. मुहूर्तावर अक्षता पडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर कार्यकर्त्यांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. एकूणच लग्नसराई, यात्रा आणि निवडणुकीमुळे वातावरण तापू लागले आहे.