फेंच ओपन ग्रँडस्लॅम: स्टॅन वावरिंकाला पराभवाचा धक्का, शॅपोव्हॅलोव्ह, कोकिनाकिस, खचानोव्ह यांचेही विजय
वृत्तसंस्था /पॅरिस
कझाकच्या इलेना रीबाकिनाने शानदार खेळ करीत या वर्षातील 30 वा विजय मिळवित फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. याशिवाय नोव्हॅक जोकोविच, कार्लोस अल्कारेझ, शॅपोव्हॅलोव्ह, कोकिनाकिस यांनीही आगेकूच केली तर वावरिंकाचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या रीबाकिनाने झेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव करीत आगेकूच केली. तिची पुढील लढत स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोशी होईल. या स्पर्धेत रीबाकिनाने जेतेपदापर्यंत मजल मारल्यास ती जागतिक अग्रस्थानाची मानकरी होऊ शकते. या मोसमात रीबाकिनापेक्षा जास्त विजय फक्त आर्यना साबालेन्काने मिळविले आहेत. साबालेन्काने 31 सामने जिंकले आहेत. त्यामुळे तिलाही अग्रस्थान मिळविण्याची संधी आहे.
जोकोविच, अल्कारेझ तिसऱ्या फेरीत
पुरुष एकेरीत दोन वेळचा चॅम्पियन सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने तिसरी फेरी गाठताना हंगेरीच्या मार्टन फुक्सोविक्सचा 7-6 (7-2), 6-0, 6-3 असा पराभव केला. त्याची पुढील लढत स्पेनच्या अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिनाशी होईल. अन्य सामन्यात कार्लोस अल्कारेझने या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी तिसऱ्या फेरीत प्रवेश करताना तारो डॅनियलवर 6-1, 3-6, 6-1, 6-2 अशी मात केली. दोन तास 25 मिनिटे ही लढत रंगली होती. या मोसमात अल्कारेझने 32 विजय मिळविले तर तीन सामने गमविले आहेत. कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हने इटलीच्या मॅटेव अरनाल्डीचा 6-2, 3-6, 6-3, 6-3 असा पराभव करीत पुढील फेरी गाठली. शॅपोव्हॅलोव्हची लढत आता अल्कारेझशी होईल. ग्रीसच्या थानासी कोकिनाकिसने पाच सेट्सच्या झुंजार लढतीत स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाचे कडवे आव्हान 3-6, 7-5, 6-3, 6-7 (4-7), 6-3 असे संपुष्टात आणले. चार तास 38 मिनिटे ही अटीतटीची झुंज रंगली होती. त्याची पुढील लढत कॅरेन खचानोव्हशी होईल. अकराव्या मानांकित कॅरेनने पात्रतेतून आलेल्या रॅडू अल्बॉटवर 6-3, 6-4, 6-2 अशी मात केली.
गेल मोनफिल्सची माघार
पहिल्या फेरीतील पाच सेट्सच्या झुंजीचा फ्रान्सच्या गेल मोनफिल्सवर परिणाम झाला असून त्याने दुखापतीमुळे प्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे जागतिक सहाव्या मानांकित होल्गर रुनेला तिसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाली. डाव्या मनगटाचे स्नायू दुखावल्याने आपल्याला पुढे खेळता येणार नसल्याचे 36 वर्षीय मोनफिल्सने सांगितले. पहिल्या फेरीत त्याला सेबॅस्टियन बाएझविरुद्ध विजयासाठी जवळपास चार तास संघर्ष करावा लागला होता आणि मध्यरात्री सव्वाबारा वाजता सामना संपला होता. टाचेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुनरागमन केल्यावर त्याने मिळविलेला हा टूर लेव्हलवरील पहिलाच विजय होता. ‘शारीरिकदृष्ट्या मी पूर्ण सक्षम व व्यवस्थित आहे. पण मनगटाच्या समस्येचा मला त्रास होत आहे. आदल्या दिवशी दीर्घ सामना खेळल्याने त्यावर ताण आला होता, पण आज मात्र थांबण्याचा निर्णय घेतला,’ असे त्याने सांगितले.
बोपण्णा-एब्डन पराभूत, युकी-साकेत दुसऱ्या फेरीत
पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. सहावे मानांकन मिळालेल्या या जोडीला फ्रान्सच्या सादिओ डुम्बिया व फॅबियन रीबोल यांच्याकडून 7-5, 7-6 (7-5) असा सुमारे पावणेदोन तासाच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. एटीपी दुहेरीच्या मानांकनात बोपण्णा 9 व्या तर एब्डन 17 व्या स्थानावर आहे. या जोडीने गेल्या मार्चमध्ये झालेल्या इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. त्याआधी फेब्रुवारीमध्ये त्यांनी कतार ओपन स्पर्धाही जिंकली होती. बोपण्णाने 2017 मध्ये येथे मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. पण यावेळी तो मिश्रमध्ये खेळणार नाही.
युकी-साकेत विजयी
अन्य एका लढतीत भारताच्या युकी भांब्री व साकेत मायनेनी यांनी स्थानिक वाईल्डकार्ड प्रवेशधारक आर्थर रिन्डेर्कनेच व एन्झो कॉकॉड यांचा 6-3, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. दोघांचाही हा ग्रँडस्लॅममधील पहिला विजय आहे. दुसऱ्या फेरीत त्यांची लढत सांतियागो गोन्झालेझ व एदुआर्द रॉजेर व्हॅसेलिन यांच्याशी होणार आहे. एन.श्रीराम व एन. जीवन यांना मात्र पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले.