बेरेटिनी, थिएम, झिदान्सेक, बॅसिलाश्विली यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ मेलबर्न
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या विभागात ब्रिटनचा माजी टॉप सिडेड अँडी मरे, रशियाचा आंदे रुबलेव्ह तसेच अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ यांनी विजयी सलामी दिली. महिलांच्या विभागात बेलारुसची आर्यना साबालेन्का, न्यूझीलंडची लैला फर्नांडिझ, टय़ुनेशियाची ऑन्स जेबॉर यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
मंगळवारी येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेने इटलीच्या 13 व्या मानांकित मॅटो बेरेटिनीचे आव्हान 6-3, 6-3, 4-6, 6-7 (5-7), 7-6 (10-5) अशा पाच सेटस्मधील लढतीत संपुष्टात आणले. मरे आणि बेरेटिनी यांच्यातील हा सामना जवळपास पाच तास चालला होता. आता अँडी मरेचा पुढील फेरीतील सामना इटलीचा फॉगनेनी आणि ऑस्ट्रेलियाचा कोकीनाकीस यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होणार आहे. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएमचा 6-3, 6-4, 6-2 अशा सेटस्मध्ये फडशा पाडत विजयी सलामी दिली. या लढतीत पाचव्या मानांकित रुबलेव्हने अचूक आणि वेगवान सर्व्हिस फोरहँड फटक्यावर अधिक भर दिला होता. रुबलेव्हने आतापर्यंत सहावेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. 2021 च्या कालावधीत त्याच्या मनगटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2020 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत थिएमने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पुरुष एकेरीच्या दुसऱया सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिझने इटलीच्या निकोलोझ बॅसिलाश्विलीचा 6-4, 6-2, 4-6, 7-5 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या विभागात बेलारुसच्या पाचव्या मानांकित साबालेन्काने 74 व्या मानांकित टेरेझा मार्टिनकोव्हावर 6-1, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये मात करत विजयी सलामी दिली. साबालेन्काने हा सामना 70 मिनिटात जिंकला. दुसऱया एका सामन्यात न्यूझीलंडच्या लैला फर्नांडिझने फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटचे आव्हान 7-5, 6-2 असे संपुष्टात आणले. गेल्या वर्षी या स्पर्धेत कॉर्नेटने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती पण यावेळी तिला 20 वर्षीय फर्नांडिझकडून हार पत्करावी लागली. टय़ुनेशियाच्या ओनेस जेबॉरला पहिल्याच फेरीतील सामन्यात विजयासाठी झगडावे लागले. द्वितीय मानांकित जेबॉरने तमारा झिदान्सेकचा 7-6 (10-8), 4-6, 6-1 असा पराभव केला. गेल्या वर्षी जेबॉरने विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. मंगळवारच्या सामन्यात स्लोव्हेनियाच्या झिदान्सेकने जेबॉरला तब्बल दोन तास 17 मिनिटे विजयासाठी झुंजवले. शेल्ब्ली रॉजर्सने पहिल्या फेरीतील सामन्यात ऍरिनी हार्टोनोचा 6-4, 6-3 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. 2021 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत रॉजर्सने तत्कालिन टॉप सिडेड ऍश्ले बार्टीला पराभवाचा धक्का दिला होता.
रशियन, बेलारुस ध्वजावर बंदी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत टेनिस ऑस्ट्रेलियाने रशियन आणि बेलारुसच्या ध्वजावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी या स्पर्धेतील युक्रेनची बँडेल आणि रशियाची रखीमोव्हा यांच्या पहिल्या फेरीचा सामना सुरू असताना टेनिस संकुलाच्या बाहेर या दोन्ही खेळाडूंच्या देशांचे ध्वज लावण्यात आले होते पण या ध्वजामुळे विनाकारण वाद निर्माण झाल्याने टेनिस ऑस्ट्रेलियाने रशियन आणि बेलारुसच्या राष्ट्रीय ध्वजावर बंदी घालण्याचा निर्णय तातडीने घेतला. दरम्यान बेलारुस आणि रशियाच्या टेनिसपटूंना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धा आयोजकांनी परवानगी दिली आहे पण या देशांच्या खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय ध्वजाखाली किंवा देशाच्या नावावर सहभागी होण्यास निर्बंध घातले आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यात अद्याप युद्ध सुरू असल्याने स्पर्धा आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागला. रखीमोव्हा आणि बेंडेल यांच्यातील सोमवारच्या सामन्यावेळी दोन्ही टेनिसपटूंचे समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.