वृत्तसंस्था/ अगरतळा
भारतीय क्रिकेट संघातील वयस्कर फलंदाज आणि यष्टीरक्षक वृद्धीमन साहा त्रिपुरा क्रिकेट संघामध्ये खेळाडू तसेच मेंटर म्हणून दाखल झाला आहे. बंगाल क्रिकेट संघटनेकडून साहाला यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते.
बंगालच्या साहाने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 40 कसोटीत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. भारतीय क्रिकेट निवड समितीने विविध मालिकांसाठी संघ घोषित करताना साहाला वगळले. यानंतर साहाने त्रिपुरा क्रिकेट संघटनेशी संपर्क साधून तो आता या संघाचा खेळाडू आणि मेंटर अशी दुहेरी भूमिका वठविणार आहे. त्रिपुरा क्रिकेट संघटना आणि साहा यांच्यातील हा करार 15 जुलैला होणार आहे. साहाच्या सहभागामुळे त्रिपुरा संघाला मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेटचा साहाला खूपच अनुभव असल्याने त्याचा लाभ त्रिपुरा संघातील नवोदितांना निश्चितच होईल. येत्या ऑक्टोबरमध्ये साहा 38 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. साहाने 2007 साली हैद्राबाद विरुद्ध आपले प्रथमश्रेणी क्रिकेट पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 122 प्रथमश्रेणी आणि 102 अ गटातील सामने खेळले आहेत. भारताचे प्रतिनिधीत्व करताना त्याने 40 कसोटीत 29.41 धावांची सरासरी राखली होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 313 झेल आणि 37 यष्टीचित केले आहेत. त्याचप्रमाणे त्याने फलंदाजीत 6423 धावा जमविल्या आहेत.