वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा आघाडीचा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या पुरुष एकेरी बॅडमिंटनपटूच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या 20 बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान मिळविले आहे. या यादीत केरळचा 29 वर्षी प्रणॉय 19 व्या स्थानावर आहे.
एच. एस. प्रणॉयने अलीकडच्या कालावधीत विविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. 2018 साली प्रणॉयने बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत आठवे स्थान मिळविले होते. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील एच. एस. प्रणॉय हा या मानांकन यादीत वरचे स्थान मिळविणारा तिसरा बॅडमिंटनपटू आहे. विश्व बॅडमिंटनपटूंच्या एकेरीच्या मानांकन यादीत भारताचा लक्ष्य सेन दहाव्या तर किदांबी श्रीकांत 11 व्या स्थानावर आहे. गेल्या मार्चमध्ये झालेल्या स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयने एकेरीची अंतिम फेरी गाठताना बी. साईप्रणितला मागे टाकले होते.
बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत महिला एकेरी विभागामध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधूने आपले सातवे स्थान कायम राखले आहे. या मानांकन यादीत सायना नेहवाल 24 व्या स्थानावर आहे. पुरुष दुहेरीच्या मानांकन यादीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या जोडीने आठवे स्थान मिळविले आहे. महिला दुहेरीच्या मानांकन यादीत अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्कीरेड्डी 24 व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या मानांकन यादीत पी. काश्यप 36 व्या स्थानावर आहे. समीर वर्मा 29 व्या तर सौरव वर्मा 44 व्या स्थानावर आहे.