सीरिजच्या निर्मितीचीही जबाबदारी पेलणार
सैफ अली खानच्या ब्लॅक नाइट फिल्म्स आणि एंडेमोल शाइन इंडियाने सुपरहिट डॅनिश/स्वीडिश वेबसीरिज ‘द ब्रिज’च्या हिंदी रिमेकची घोषणा केली आहे. या सीरिजमध्ये सैफ अली खान दिसून येणार आहे. तसेच याच्या हिंदी वर्जनच्या निर्मितीत तो योगदान देणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर निर्माता म्हणून त्याची ही पहिली वेबसीरिज असणर आहे.
द ब्रिज या सीरिजचा हिंदीसह अनेक भाषांमध्ये रिमेक केला जात आहे. ही सीरिज एका मर्डर मिस्ट्रीसोबत घुटमळणारी आहे. एक मृतदेह दोन देशांच्या सीमेवर आढळून येतो, ज्यावरून दोन्ही देशांचे पोलीस एक शोधमोहीम सुरू करत असल्याचे यात दर्शविण्यात आले होते. या सीरिजमध्ये मुख्य भूमिका सैफ अली खान साकारणार आहे.
या सीरिजसंबंधी सैफ अली खान अत्यंत उत्सुक आहे. एक अभिनेता तसेच निर्माता म्हणून हे आव्हानात्मक आहे. अशाप्रकारच्या आव्हानाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. या सीरिजला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. याचमुळे ही सीरिज हिंदीत आणू इच्छित असल्याचे सैफने म्हटले आहे.