वृत्तसंस्था/ गिक्वेबेरा (दक्षिण आफ्रिका)
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील गट 2 मधील महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता प्रारंभ होईल.
या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत दोन सामने जिंकून उपांत्य फेरीसाठी आपली स्थिती भक्कम केली आहे. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या गटातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सात गड्यांनी दणदणीत पराभव केला. त्यानंतर विंडीज संघावर भारताने सहा गडी राखून विजय मिळवला. आयसीसीच्या टी-20 महिलांच्या सांघिक मानांकनात सध्या इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. शनिवारच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत केले तर त्यांचे बाद फेरीतील स्थान निश्चित होईल. आता या गटातून इंग्लंड आणि भारत यांच्यातच पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी रस्सीखेच राहिल. भारतीय संघातील रिचा घोषची फलंदाजी इंग्लंडविरुद्धच्या गेल्या दोन सामन्यात चांगलीच बहरल्याचे जाणवले. आयसीसीची 19 वर्षाखालील वयोगटाची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा हिला अद्याप या स्पर्धेमध्ये फलंदाजीचा सूर मिळालेला दिसत नाही. सलामीची धडाखेबाज फलंदाज स्मृती मंदाना फलंदाजीचा सूर मिळवण्यासाठी झगडत आहे. तसेच तिला बोटाला झालेल्या दुखापतीच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. आतापर्यंत जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांच्या फलंदाजीत सातत्य दिसत आहे.
इंग्लंड संघातील फिरकी गोलंदाज चार्ली डीन, सोफी इक्लेस्टोन आणि सारा ग्लेन यांच्यासमोर भारतीय फलंदाजीची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. विंडीजविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी निश्चित सुधारल्याचे जाणवले. आता इंग्लंडविरुद्ध भारतीय गोलंदाजांना अधिक टिचून गोलंदाजी करावी लागेल. इंग्लंड संघातील अॅलिसी कॅप्से ही चांगल्याच फॉर्ममध्ये असून तिने अलीकडेच या स्पर्धेत जलद अर्धशतक नोंदवण्याचा पराक्रम केला आहे. पूजा वस्त्रकर तसेच रेणुका सिंग ठाकुर, दीप्ती शर्मा यांच्यावर भारतीय गोलंदाजीची भिस्त राहिल. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला आपल्या क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल. क्षेत्ररक्षणातील चुका सुधारणे हिताचे ठरेल. गट 2 मधून आता इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या पात्रतेच्या उंबरठ्यावर आहेत. भारताने तसेच इंग्लंडने समान चार गुण नोंदवले असले तरी सरस धावसरासरीत भारताने +0.590 तर इंग्लंडने +2.497 अशी राखली आहे. इंग्लंड संघातील कॅप्से, बेल यांना फलंदाजीत नाईट, वेट, ब्रंट आणि नॅट स्किव्हेर यांची साथ मिळत आहे.
भारतीय संभाव्य संघ- हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मंदाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, रॉड्रीग्ज, हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुकासिंग ठाकुर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजश्री गायकवाड, शिखा पांडे.
इंग्लंड- हिथेर नाईट (कर्णधार), बेन, बाऊचर, अॅलिसी कॅप्से, केटी क्रॉस, डेविस, डीन, डंक्ले, इक्लेस्टोन, ग्लेन, अॅमी जोन्स, कॅथरेनी स्किव्हेर ब्रंट, नॅट स्किव्हेर ब्रंट, विनफिल्ड आणि डॅनी वेट.
सामन्याची वेळ सायंकाळी 6.30 वाजता.