बर्ड हंटिंग फेस्टिव्हलला प्रारंभ
15 देशांच्या ईगल हंटर्सनी दाखविले कौशल्य
किर्गिस्तानात बर्ड हंटिंग फेस्टिव्हल ‘सालबुरुन’ साजरा करण्यात आला आहे. बिश्केक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील चंकुरचक पठारात हा महोत्सव साजरा करण्यात आला. यात 15 हून अधिक देशांच्या ईगल हंटर्सनी भाग घेतला आहे. यात सामील होणारे लोक अशा गरुड किंवा घारीला आणतात, ज्याला शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले असेल.
या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी होते. यंदा यात किर्गिस्तान, उझ्बेकिस्तान, तुर्कीये, मलेशिया, सिंगापूर, मंगोलिया, रशिया, हंगेरी, अमेरिका, जर्मनी, चेक प्रजासत्ताक, जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि इंडोनेशिया समवेत मध्य आशियाच्या बर्ड हंटर्सनी भाग घेतला आहे. हे पक्षी इतके माणसाळलेले आहेत की ते अनोळखी माणसांच्या खांद्यावर किंवा हातावर येऊन बसतात. या महोत्सवात भाग घेणारे स्वतःच्या गोल्डन ईगलला कोल्हा किंवा सशाची शिकार करण्यासाठी सोडत असतात.
1200 वर्षांपासूनची परंपरा
किर्गिस्तानात कोल्हा आणि रानटी श्वान लोकांच्या अश्व आणि शेळय़ांची शिकार करत होते. यामुळे लोक अत्यंत त्रस्त असायचे. याचमुळे 9 व्या शतकात लोकांनी पक्षांना शिकार करणे शिकविले. याचबरोबर या महोत्सवाची सुरुवात झाली. कालौघात यात भाग घेण्यासाठी विदेशातूनही लोक येऊ लागले.
तिरंदाजी, तलवारबाजी
उत्सवात महिला देखील तिरंदाजी आणि तलवारबाजीतील स्वतःचे कौशल्य दाखवून देत असतात. परंतु मुख्य आकर्षण ईगल हंटिंगचे असते. किर्गिस्तानात एका अनुमानानुसार 3000 हून अधिक ईगल हंटर्स आहेत. यातील 300 हून अधिक चंकुरचक पठाराच्या भागात आहेत. चंकुरचक पठार समुद्रसपाटीपासून 2400 मीटर उंचीवर आहे. देशविदेशातील पर्यटकांसाठी हे अत्यंत पसंतीचे ठिकाण आहे.