वृत्तसंस्था/ मुंबई
जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत सूचीबद्ध बिगर-वित्तीय खासगी कंपन्यांची विक्री 41 टक्क्यांनी वाढून 14.11 लाख कोटी रुपये झाली आहे. या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती प्राप्त झाली आहे.
जानेवारी-मार्च 2021-22 तिमाहीत विक्री 22.3 टक्के आणि एप्रिल-जून, 2021-22 तिमाहीत 60.6 टक्क्यांनी वाढली. आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील 2,749 सूचीबद्ध बिगर-सरकारी बिगर-वित्तीय कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या आधारे खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीचा डाटा मांडलेला आहे.
आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत उत्पादन कंपन्यांच्या विक्रीत वार्षिक तुलनेत 41.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये 21.3 टक्के वाढ झाली. वार्षिक आधारावर, उत्पादन, आयटी आणि नॉन-आयटी सेवा कंपन्यांसाठी कर्मचाऱयांचा खर्च अनुक्रमे 10.3 टक्के, 23.5 टक्के आणि 20 टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती आहे.