विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाजातर्फे 1 ते 4 फेब्रुवारीदरम्यान समादेवी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. 1 रोजी सकाळी काकड आरती, कुंकुमार्चन, सकाळी 11 वा. देवी दरबारचे उद्घाटन, नंतर दुपारी भजन, सायंकाळी 5 ते 8.30 या वेळेत मुलांच्या विविध स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. गुरूवार दि. 2 रोजी सकाळी काकड आरती, मंत्र पुष्पांजली, दुपारी भजन, श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचा सत्संग, भजन, सायंकाळी 7 ते 9 या वेळेत माधव कुंटे यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे विनोदी एकपात्री नाटक होईल.
शुक्रवारी उत्सवाचा मुख्य दिवस असून, सकाळी चौघडा व काकड आरती, महाअभिषेक, महानैवेद्य व त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. पुराण वाचन, पालखी प्रदक्षिणा, तसेच पाचवी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गेंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली, समादेवी मंदिर या मार्गावर काढली जाणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे. शनिवार दि. 4 रोजी सकाळी नवचंडीका होम, दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.