आटपाडी/प्रतिनिधी
आकर्षक आणि जातिवंत माडग्याळ जातीच्या अवघ्या दोन महिने वय असलेल्या बकऱ्याला तब्बल ३१ लाख रुपयांना मागणी झाली आहे. सदर बकऱ्याचे कुतूहल राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने यांनाही होते. पाहता क्षणी नजरेत भरणाऱ्या ३१ लाख रुपयाच्या बकऱ्याची मंत्र्यांना, खासदारांनाही भुरळ पडली. यावेळी मंत्र्यांच्या हस्ते या बकऱ्याच्या गळ्यात हार घालून पशु पालकांचाही सन्मान करण्यात आला.
आटपाडी तालुका जातिवंत खिलार खोंड, गाय, बैल, शेळ्या-मेंढ्या यासाठी प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षात जातिवंत मेंढ्यांना ग्लॅमर मिळाले आहे. त्यामुळे चांगली ठेवण आणि पोपटाच्या चोचीचा आकार डोक्याला असलेल्या बकऱ्यांना विक्रमी दर मिळत आहे. यापूर्वी आटपाडी मध्ये दीड कोटीचा मोदी बकरा त्याचेच वंश असलेला व चोरीला गेल्यामुळे चर्चेत आलेला १६ लाखाचा बकरा प्रसिद्धीस आला होता.
आटपाडी येथील शेतकरी मेळावा आणि जिल्हा बँक संचालक तानाजीराव पाटील अभिष्टचिंतन सोहळ्यात अवघे २ महिने वयोमान असलेला आणि ३१ लाख रुपये किमतीला मागणी झालेला बकरा लक्षवेधी ठरला. बाजार समितीचे माजी संचालक सुबराव पाटील, शेतकरी विलास पाटील यांच्या मालकीचा हा बकरा मंत्री महोदय एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिलभाऊ बाबर, आमदार शहाजीबापू पाटील, नितिन बानुगडे-पाटील यांच्या उपस्थितीत स्टेजवर गौरविण्यात आला. मंत्री महोदयांनी अलिशान गाडीची किंमत लाभलेल्या ३१ लाख रुपयांच्या बकऱ्याच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आश्चर्य व्यक्त केले.