आंबेडकर स्टेडियमची १७.४५ कोटी फाईल मंत्रालयात पडून, चकित चंदूचे यामागे राजकारण, स्टेडियम-स्मारकाची विटंबना, केवळ जयंती निमित्ताने अभिवादनाचे ढोंग मनपाने बंद करावे
सांगल/प्रतिनिधी
सांगली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आणि मिरज रोडवरील ज्योतिबा फुले यांचे स्मारकाच्या दुरावस्थेकरिता केवळ मनपा महापौर जबाबदार आहेत. आज अखेरपर्यंत आंबेडकर स्टेडियम, फुले स्मारक याबाबत मंजूर केलेला निधी व खर्च केलेला निधी याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यातून मोठा भ्रष्टाचार उघडकीस आल्या शिवाय राहणार नाही. तसेच मनपा प्रशासनवर कायदेशीर कारवाई करावी याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी केली.
वेटम म्हणाले, सन १९९८ पासून महानगरपालिकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचीच सत्ता अनेक वर्षापासून आहे. काही वर्ष भाजपची सत्ता होती. स्टेडियममधील बेकायदा अतिक्रमण, पॅव्हिलियन दुरावस्था, क्रिडांगणाचे समपातळी, मुरुमीकरण, मोजणी, एका व्यायाम मंडळाचे बेकायदेशीर अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग, लाईट सुविधा नसणे आदी समस्याबाबत आम्ही सन २०१६ पासून याविरुद्ध आवाज उठवत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी आम्ही केलेल्या तक्राराची गांभीर्याने दखल घेत स्टेडियमची दुरवस्थेची पाहणी केली. तसेच स्टेडियमच्या विकासाबाबत १७.४५ कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात सन २०१७ रोजी पाठवला. परंतु त्यावेळी भाजप सरकारने जाणीवपूर्वक हा निधी मंजूर केला नाही. यानंतर पुरोगामित्व ढोंग करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता महानगरपालिका तसेच राज्यात आली. परंतु राजकारणातील ‘चकित चंदू’ यांच्या हस्तक्षेपामुळे हा प्रस्ताव धूळ खात पडलेला आहे. या प्रस्तावास राज्य सरकार तर्फे जाणीवपूर्वक मंजुरी देण्यात येत नाही. आम्ही आंबेडकर स्टेडियम आणि फुले स्मारक दुरवस्थेबाबत वेळोवेळी निवेदन मुख्यमंत्री, मनपा महापौर तसेच आयुक्तांना दिलेले आहे. केवळ किरकोळ डागडुजी यापलीकडे काही केले नाही. या दुरावस्थेस मनपा महापौर तसेच आयुक्त जबाबदार आहेत. या महापुरुषांच्या नावाने असणारे स्मारक आणि स्टेडियम विटंबना अवस्थेत ठेवून पुन्हा उजळमाथ्याने मनपा प्रशासन हे आंबेडकर व फुले जयंती निमित्त अभिवादन करण्याचे ढोंग करतात याहून मोठी थट्टा असू शकत नाही.