हॉटेलमध्ये तोडफोड, महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ
प्रतिनिध/मिरज
शहरातील एसटी स्टँडजवळ शिवभोजन थाळी मिळणाऱ्या हॉटेलमध्ये जेवण देण्याच्या कारणावरून दोघा नशेखोर गुंडानी धिंगाणा घातला. मॅनेजर महिलेला शिवीगाळ करत हॉटेलची तोडफोड केली. नशेखोर तरुणांची ही गुंडगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या प्रकरणी हॉटेल चालक विष्णू विठोबा बेल्लारी यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
जुन्या एसटी स्टँड जवळ हॉटेल वेंकटेश्वरा येथे महाराष्ट्र शासनाच्या शिवभजन थाळीचे वाटप केले जाते. शिवभोजन थाळीची मागणी करत यातील एक युवक हॉटेलमध्ये आला. तो दारू व गांजाच्या नशेत हॉटेलमध्ये प्रवेश करताच अर्वाच्य बोलत होता. तेथील महिला कर्मचाऱ्याने अश्लील बोलू नका येथे माणसे जेवण करीत आहेत, तुम्हाला जेवण हवे असेल तर पार्सल घेऊन जावा, असे सांगितले. यावर त्या गुंडाने येथेच जेवण करणार असे सांगितले. तेथील कर्मचाऱ्यांनी तुम्ही नशेत असल्याने इतर लोकांना त्रास होतो. त्यामुळे जेवण पार्सल घेऊन जा, असे सांगितल्याने त्याला राग आला. तो गुंड दुसऱ्या गुंडाला घेऊन आला. दोघांनी हॉटेलमधील कर्मचारी मॅनेजर महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत तोडफोड व नासधूस केली. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तैलचित्र असलेल्या पोस्टरवरही लाथा मारून काढून टाकले. सदरचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत हॉटेलचालक बेल्लारी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली असून, दोघांना नशेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.