विटा प्रतिनिधी
विट्यात राहत्या घरातील बेडरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण तीन लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवार 28 ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी पोपटराव विठोबा जाधव (रा. सिद्धीविनायक कॉलनी, साळशिंगे रोड, विटा) यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील पोपटराव जाधव हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. ते सध्या साळशिंगे रस्त्यावरील सिद्धीविनायक कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. सोमवार 28 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील बेडरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला. घरातील 60 हजार रूपये किंमतीच्या 20 ग्रॅम वजनाच्या 10 लहान सोन्याच्या अंगठ्या, 60 हजार रूपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे दोन वेडण आणि एक लाख 85 हजार रूपयांची रोकड असा एकूण तीन लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे जाधव यांनी फिर्यादीत म्हंटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची विटा पोलिसांत नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष डोके करीत आहेत.