सांगली/प्रतिनिधी
येथील राकेश दड्डणावर या युवकाने कोणत्याही अपेक्षेविना १ मे २०१८ रोजी काही विश्वासू व समविचारी सवंगड्याना घेऊन सलग गेली १४६० दिवस सांगलीसह आजुबाजूच्या परिसराची स्वच्छता व सुशोभीकरणाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे. यामध्ये ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक अडचणींवर मात करत आपले कार्य अविरत चालू ठेवले. हे समाजोपयोगी कार्य करताना त्यांना अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती व प्रशासनाचीही साथ मिळाली. अल्फावधीत यांच्या कार्याची चर्चा सांगली पंचक्रोशीत होऊ लागली,ती त्यांच्या स्वच्छतेच्या कामाने.
अशा या राकेश व त्याच्या सवंगड्यांचा सहकुटुंब सन्मान समारंभ रविवार दि. १ मे रोजी वेळ सकाळी १० वाजता कल्पद्रुम क्रीडांगण, जैनबस्ती शेजारी, नेमिनाथनगर, विश्रामबाग सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे. तरी या अभूतपूर्व सोहळ्यास स्वच्छतादूतांना प्रोत्साहन तसेच शुभेच्छा देण्यासाठी सांगलीकरांनी उपस्थित रहावे यासाठी जाहीर आवाहन राकेश दड्डणावर यांनी केले आहे.