ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात थेट 50 टक्क्यांची कपात (Mumbai AC Local ticket rate reduce by 50 percent) करण्यात आल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे. त्यामुळे आता एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत.
मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना दानवे म्हणाले, मुंबईकरांसाठी लाईफलाईन असलेली लोकल अपग्रेड करत पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी लोकल सेवा सुरू केली. मात्र, त्याचे दर सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे होते. त्यामुळे एसी लोकलचे दर कमी करण्याची मागणी होत होती. भारतीय रेल्वे बोर्डानं मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्क्यांची कपात करण्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही आता एसी लोकलने प्रवास करता येणार आहे.
रेल्वेसाठी आम्ही 2009 ते 2014 या काळात 1100 कोटी रुपये दिले. यावर्षीच्या बजेटमध्ये 11000 हजार कोटी रुपये दिले. दहा पट रक्कम आमच्या सरकारने रेल्वेसाठी दिली आहे. 2023 पर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण इलेक्ट्रिक स्वरूपातील रेल्वे चालणार आहेत.