Kolhapur News : गेली 13 महिने रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी अखेर पुण्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) संजय तेली यांची नियुक्ती झाली. शुक्रवारी त्यांच्या पद्स्थापनेचे आदेश काढण्यात आले.सायंकाळी त्यांनी पदभारही स्विकारला.त्यांनी यापूर्वी 2012मध्ये कोल्हापूरात जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
गेल्यावर्षी जून महिन्यात तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे प्रभारी पदभार होता. आता संजय तेली यांची या पदावर नियुक्ती झाली. यापूर्वी पुणे जिह्यात उपजिल्हाधिकारी (महसूल) म्हणून कार्यरत होते. त्यांचे मूळगाव फलटण (जि. सातारा) आहे. 1999मध्ये अचलपूर (जि.अमरावती) येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरूवात झाली. त्यानंतर दर्यापूर (जि.अमरावती) येथे तहसीलदार म्हणून रूजू झाले. यानंतर त्यांनी विविध ठिकाणी तहसीलदार म्हणून काम केले.
2009मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती होऊन अलिबाग येथे जिल्हा पुरवठा अधिकारी झाले. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी, कराड प्रांताधिकारी, खेड प्रांताधिकारी व कोल्हापूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या पाडल्या आहेत.