गोव्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजाविणारा सासष्टी तालुका यंदा जवळपास 42 वर्षांनंतर प्रथमच मंत्रीपदापासून वंचित राहिला आहे. 1980 पासून सलग या तालुक्याला गोवा सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळत आले होते पण यंदा सासष्टीला वगळून इतर तालुक्यांना भाजपने मंत्रिपदे दिली आहेत. सासष्टी तालुका हा अल्पसंख्यांक मतदारांचे वर्चस्व असलेला तालुका असल्याने 2024मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीत भाजपला कोणताच फायदा होणार नसल्यानेच सासष्टी तालुका मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आला आहे.
भाजपने यापूर्वी अल्पसंख्यांकांमध्ये मजबूत प्रवेश करण्याचा निर्धार अवघ्या दीड दशकापूर्वी मिशन सासष्टीद्वारे करण्यात आला. त्यासाठी मनोहर पर्रीकर यांनी कंबर कसली होती. त्यासाठी त्यांनी विविध प्रयोग करून पाहिले पण सासष्टीतील अल्पसंख्याक मतदार भगव्या भाजपला स्वीकारत नाही, हे निकालातून स्पष्ट झाले. भाजप सरकारात सासष्टीतील आमदारांना मंत्रिपदे मिळाली तरी त्यांना नंतर निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागतो. त्यामुळे भाजपने यावेळी सासष्टीला मंत्रीपद न देता ज्या भागात भाजपला जास्त मते मिळू शकतात अशाच भागावर लक्ष केंद्रित केल्याचे मंत्रीमंडळ रचनेतून स्पष्ट होत आहे.
यंदा फोंडा तालुक्यातील चारपैकी चारही मतदारसंघात मंत्रिपदे देण्यात आली आहेत. चारपैकी प्रियोळ मतदारसंघ हा उत्तर गोव्यात येतो. उर्वरित तीन मतदारसंघ फोंडा, मडकई व शिरोडा हे दक्षिण गोव्यात येतात. या तीन मतदारसंघातून भाजपने किमान 30 ते 35 हजार मतांचे टार्गेट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठेवले असेल, हे नक्की कारण लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपला विजय मिळवायचा असेल तर फोंडा तालुक्यात 30 हजार मते प्राप्त करणे आवश्यक आहे. जर या ठिकाणी मते घटली तर भाजपला विजय मिळविणे कठीण जातं हे गेल्या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला वीस जागा मिळाल्या. त्यात सासष्टीतून एक आमदार निवडून आला. मगोचे दोन आमदार व तीन अपक्ष आमदार मिळून भाजपला पाठिंबा देणाऱयांची संख्या पंचवीसपर्यंत पोहोचली. त्यामुळे सासष्टीला फार महत्त्व देण्याची गरजदेखील भाजपला भासलेली नाही. भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना मंत्रिपद मिळणार, असा सर्वांचा कयास होता पण आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना मंत्रिपद देऊन भाजपला काहीच फायदा होणार नाही, हे भाजपच्या नेतृत्वाने जाणले. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सला मंत्रिपद मिळाले तरी ते फार मोठा चमत्कार करू शकले नसते कारण यापूर्वी विजय सरदेसाई हे भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी होते. तरीसुद्धा ते लोकसभा निवडणुकीत फातोडर्य़ात भाजपला आघाडी मिळवून देण्यात अपयशी ठरले होते. मुळात सासष्टीतील आमदार हे अल्पसंख्याक मतदारांच्या मतांवर निवडून येतात. त्यामुळे अल्पसंख्याक मतदारांना ते भाजपला मते द्या, असे सांगू शकत नाही किंवा तसे धाडस करीत नाही कारण सासष्टीतील अल्पसंख्याक मतदार भगव्या भाजपला स्वीकारत नाही.
अगदी दोन दशकांपूर्वी 2002 मध्ये, सासष्टीतील दोन आमदार मिकी पाशेको आणि अपक्ष आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांना दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये स्थान मिळाले होते. फिलिप नेरी आणि मिकी दोघेही तीन वर्षांनंतर 2005 मध्ये सरकारमधून बाहेर पडले ही दुसरी बाब आहे. एवढेच नाही तर 2012 मध्ये काँग्रेस विरोधी लाटेवर स्वार होऊन भाजप सत्तेवर आल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी आपल्या मंत्रीमंडळात सासष्टी तालुक्याला प्रतिनिधीत्व दिले. भाजपने स्वबळावर एकवीसचा जादुई आकडा गाठला होता परंतु पर्रीकर यांनी त्यांच्या शहाणपणाने नावेलीचे अपक्ष आमदार आवेर्तान फुर्तादो यांचा मंत्रीमंडळात समावेश केला होता. पर्रीकर यांच्या सरकारला आणखी एक अपक्ष आमदार बेंजामिन डिसिल्वा, गोवा विकास पक्षाचे आमदार-मिकी पाशेको आणि कायतू सिल्वा यांनी देखील पाठिंबा दिला होता. 2017च्या विधानसभा निवडणुकीत चाळीस सदस्यांच्या सभागृहात भाजपला केवळ तेरा जागा मिळाल्या परंतु विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील गोवा फॉरवर्ड पक्षाने पुन्हा एकदा मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिल्याने सासष्टीला मंत्रीपद मिळाले. 2019 मधील राजकीय उलथापालथीमध्ये सासष्टीने उत्कृष्ट भूमिका बजावली होती. जेव्हा पर्रीकरांचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मंत्र्यांना बाहेरचा दरवाजा दाखवला होता. त्यावेळी काँग्रेसच्या दहा आमदारांनी पक्ष सोडण्यासाठी आणि भाजपला आलिंगन देण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत तयार केले, तेव्हा यापैकी तीन आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्ज, क्लाफास डायस व विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा हे सासष्टीचे होते. अल्पसंख्याकांच्या बालेकिल्ल्यात, त्या बदल्यात, फिलिप नेरी यांना मंत्रीपद बहाल करण्यात आले, तर क्लाफास डायस आणि विल्प्रेड डिसा या दोघांना मुरगाव आणि दक्षिण गोवा नियोजनासाठी नामांकन देण्यात आले होते. मात्र, भाजपला त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट हे तिन्ही आमदार पराभूत झाले.
सासष्टीवर जास्त शक्ती खर्च करण्याऐवजी ज्या मतदारसंघात भाजपला पोषक वातावरण असेल, त्याच ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करायचे व 2024 मध्ये पुन्हा दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रचंड विरोध असून देखील मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर सांगे तालुक्याला मंत्रीपद बहाल करण्यात आले आहे. सासष्टीतील पाचपैकी कुंकळळी, फातोर्डा, नावेली व मडगाव या चार मतदारसंघात भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. ते भाजप सोडून कुणाला मतदान करणार नाही, याची खात्री देखील पक्ष नेतृत्वाला आहे. चार मतदारसंघातून भाजप सहजरित्या 30 हजार मते प्राप्त करू शकतो पण काँग्रेसवर वर्चस्व ठेवू शकत नाही आणि त्यामुळेच यंदा सासष्टी मंत्रिपदापासून वंचित राहिली आहे.
महेश कोनेकर