अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने पृथ्वीवरील पाणीसाठय़ांचे सर्वेक्षण करण्यासाठी एक उपग्रह नुकताच अंतराळात धाडला आहे. अशा प्रकारचा हा आजवरचा प्रथमच उपग्रह आहे. शुक्रवारी त्याचे कॅलिफोर्नियातील वेंडनबर्ग अंतरीक्ष केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. नासाचे अध्यक्ष बिल नेल्सन यांनी ही माहिती दिली. या उपग्रहाचा उपयोग पृथ्वीवरील सरोवरे, नद्या, जलाशय, धरणे, ओढे, झरे, नाले इत्यादी पाणीसाठय़ांच्या सर्वेक्षणासाठी होणार आहे.
तसेच, समुद्रांचे तापमान, प्रतिकूल वातावरण, प्रतिकूल मोसम, वनांना लागणारे वणवे इत्यादी आपत्तींचे सर्वेक्षणही या उपग्रहाद्वारे केले जाईल. या साऱया सर्वेक्षणाचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर हानी टाळण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तींची नेमकी तीव्रता मापण्यासाठी होणार आहे. हा उपग्रह दिवसाला 1000 जीबी इतकी माहिती अवकाशातून पाठविणार आहे. साऱया जगाला या माहितीचा उपयोग होणार असून सर्व देश या महितीचा उपयोग करु शकतात. पृथ्वीच्या वातावरणातील हैड्रोजन आणि ओझोन कवच यांच्या स्थितीचा अभ्यासही हा उपग्रह करणार आहे.
अत्याधुनिक विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन अधिक समृद्ध आणि सुखकारक करण्यासाठी करणे हे संशोधकांचे ध्येय आहे. त्यानुसार या उपग्रहाची रचना करण्यात आली असून तो नैसर्गिक आपदांचे आधी अनुमान लावण्यासाठी उपयोगी पडणार आहे. अमेरिकेला या उपक्रमापासून बऱयाच अपेक्षा आहेत.