वृत्तसंस्था/ पॅरीस
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या प्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरुष आणि महिला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली.
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱया आठव्या मानांकित सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी कोरियाच्या चोई गेयु आणि किम हो यांचा 21-18, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये 45 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2022 च्या बॅडमिंटन हंगामातील विश्व टूरवरील स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग या जोडीने दुसऱयांदा अंतिम फेरी गाठली आहे. चालू वर्षीच्या प्रारंभी झालेल्या इंडिया खुल्या सुपर 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी दुहेरीचे जेतेपद मिळवले होते.