प्रतिनिधी / बेळगाव
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेचे नूतन अध्यक्ष म्हणून सीए मडिवाळप्पा एस. तिगडी यांची निवड झाली आहे. इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
उपाध्यक्ष सीए राजेंद्र मुंदडा, सचिव सीए वीरण्णा मुरगोड व सिकासा चेअरमन सीए सचिन खडबडी, खजिनदार सीए नितीन निंबाळकर तर कोऑर्डिनेटर म्हणून सीए संजीव देशपांडे यांनी पद्भार स्वीकारला. संस्थेच्या दक्षिण भारत प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष सीए पन्नराज एस. यांच्या हस्ते शपथविधी सोहळा पार पडला.
यावेळी सीए शिवानंद हलभावी यांनी आधुनिक करप्रणाली या विषयावर शोधनिबंध सादर केला. याप्रसंगी पन्नाराज म्हणाले, चार्टर्ड अकौंटंट्सनी राष्ट्र उभारणीतील भागीदार म्हणून केवळ आर्थिक वाढीऐवजी मानवी विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सीए तिगडी यांनी सभासद, विद्यार्थी यांच्यासाठी तसेच कर आणि आर्थिक साक्षरता, विद्यार्थ्यांसाठी पिगी बँक आदी उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. मावळते अध्यक्ष सीए नितीन निंबाळकर यांनी बेळगाव शाखेच्या सदस्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन सीए अभिषेक पोरवाल यांनी केले, सीए वीरण्णा मुरगोड यांनी आभार मानले.