कर्नाटकाच्या उत्तर विभागात प्रथमच पदाधिकाऱयांची निवड
प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय कुस्ती संघ यांच्या आदेशानुसार कर्नाटक राज्य कुस्ती संघाची नवनिर्वाचित संघटनेची कार्यकारिणी काडा कमिटी व निवृत्त न्यायाधीश अशोक पुजारी यांच्या देखरेखीखाली निवडण्यात आली. गुनारंजन शेट्टी या नूतन संघटनेचे अध्यक्ष, विश्वनाथ पाटील उपाध्यक्ष तर सचिवपदी महेश डुकरे व खजिनदारपदी ऑलिम्पियन एम. आर. पाटील यांची वर्णी लागली आहे.
हॉटेल संकम येथे भारतीय कुस्ती संघ यांच्या आदेशानुसार कर्नाटक राज्य कुस्ती संघाची निवडणूक घोषित करण्यात आली होती.
गेली 57 वर्षे कर्नाटक कुस्ती संघ बेंगळूर, म्हैसूर या दोन जिल्हय़ांपुरतीच मर्यादित होती. जुन्या कार्यकारिणीने आपल्या मनाप्रमाणे कार्यकारिणी नेमून कारभार चालविला होता. या कार्यकारिणीने कोणत्याही कुस्तीपटूला किंवा खेळाडूला कोणतेही साहाय्य केले नाही. त्यामुळे अनेक कुस्तीपटुंना त्रास सोसावा लागत होता. या संघटनेबाबत बेळगावच्या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघाला कळविले होते. त्यानुसार भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी कर्नाटक कुस्ती संघाची नूतन कार्यकारणी निवडावी, असे आदेश दिले. त्यानुसार रविवारी बेळगावात या कार्यकारिणीसाठी निवृत्त न्यायाधीश प्रकाश पुजारी यांच्या देखरेखीखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी जुन्या कार्यकारिणीने वरून दडपण आणून जुन्या कार्यकारिणीचे पदाधिकारी पुन्हा नेमावेत यासाठी प्रयत्न केले. पण पदाधिकाऱयांनी त्यांच्या विरूद्ध मतदान करून नूतन कार्यकारिणीला निवडून दिले. त्यामध्ये बेळगावचे ऑलिम्पियन एम. आर. पाटील, ज्युनियर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेले महेश डुकरे, इंटर युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविलेले विश्वनाथ पाटील यांची या कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.
ही निवडणूक बिनविरोध झाल्याने नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी गुनारंजन शेट्टी बेंगळूर, वरि÷ उपाध्यक्ष जी. एस. न्यामगौडा बागलकोट, उपाध्यक्षपदी-विश्वनाथ पाटील बेळगाव, कल्लाप्पा रामाप्पा पिचेली बागलकोट, यशवंत यमनापण्णवर कारवार, वीरेश के. एम. दावणगेरी, एल चरणराज म्हैसूर, खजिनदारपदी ऑलिम्पिकपटू एम. आर. पाटील बेळगाव, सचिवपदी महेश डुकरे बेळगाव, उपसचिव पदी सोलोमन व्हीक्टर तुमकूर, के. एन. विजयकुमार रामनगर, जे. श्रीनिवासा बेंगळूर, कार्यकारी सभासद म्हणून लिंगराजू एस. एल. मंडय़ा, विनोदकुमार के. म्हैसूर, अशोक चिल्लण्णावर धारवाड आदी सभासदांचा समावेश आहे.