वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वरिष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचे निधन झाले आहे. बाथरुममध्ये घसरून पडल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. 78 वर्षीय वैदिक यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले होते, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वैदिक हे हिंदी प्रसारमाध्यमांमधील गाजलेले पत्रकार होते. त्यांनी दहशतवादी हाफिज सईदची मुलाखत घेतली होती. वैदिक हे राजकीय विश्लेषक म्हणून देखील कार्यरत होते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
वैदिक हे भारतीय भाषा संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये 30 डिसेंबर 1944 रोजी त्यांचा जन्म झाला होता. वैदिक यांनी जवळपास 80 देशांना भेटी दिल्या होत्या. संस्कृत, हिंदी, उर्दू, फारसी, रशियन आणि इंग्रजी भाषा त्यांना अवगत होती. 2014 मध्ये त्यांनी दहशतवादी हाफिजची मुलाखत घेतली होती. यामुळे ते वादात सापडले होते. याप्रकरणी त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हाही नोंदविला गेला होता.