सेन्सेक्स 126 अंकांनी वधारला, अदानींचे दहा समभाग घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार काहीसा वधारत बंद झाल्याचे पहायला मिळाले. अदानी उद्योग समूहाचे 10 समभाग मात्र घसरणीत असताना दिसले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 126 अंकांनी वधारत 57,653 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 40 अंकांनी वधारत 16,985 अंकांवर बंद झाला. बाजारामध्ये आज बऱ्यापैकी घसरणीचा कल राहिला होता. स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास दीड टक्के इतका घसरणीत राहिला होता. बाजारामध्ये सोमवारी गुंतवणूकदारांचे सुमारे 1.12 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. दिवसभरात एकावेळी सेन्सेक्स जवळपास 490 अंकांनी वधारला होता. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांचा विचार करता फार्मा आणि धातू निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. तर दुसरीकडे युटिलिटी, टेलिकम्युनिकेशन, ऑईल आणि गॅस, ऊर्जा आणि रिअल्टी क्षेत्राचे निर्देशांक घसरणीत राहिले होते. बीएसईवरील लिस्टेट कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल सोमवारी 253.51 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. हेच बाजारभांडवल शुक्रवारी 254.63 लाख कोटी रुपये होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 समभाग तेजीसमवेत बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक 1.54 टक्के इतके तेजीत राहिले होते. यांना मारुती सुझुकी, सन फार्मा, भारतीय स्टेट बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागांनी तेजी राखत उत्तम साथ दिली. पॉवरग्रीड कॉर्प, अॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, एचडीएफसी, लार्सन अँड टुब्रो, आयडीबीआय बँक यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. कोटक बँक, आयटीसी, टाटा स्टील, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले होते. ग्रासीम, रिलायन्स आणि सिप्ला हे तीन समभाग सर्वाधिक तेजीत राहिले तर अदानी पोर्ट्स, एसबीआय इन्शुरन्स आणि पॉवरग्रीड हे सर्वाधिक घसरणीत राहिले होते.
जागतिक बाजारांचा विचार करता अमेरिकेतील व युरोपातील बाजार तेजीसमवेत व्यवहार करत होते. आशियाई बाजारात मात्र चढउतार पहायला मिळाला. डो जोन्स 132 अंकांनी आणि नॅसडॅक 36 अंकांनी वधारत व्यवहार करत होते. आशियाई बाजारात निक्की, सेट कम्पोझिट, स्ट्रेट टाईम्स यांचे निर्देशांक तेजीमध्ये तर जकार्ता कम्पोझिट, शांघाय कम्पोझिट, हँगसेंट यांचे निर्देशांक घसरणीत होते.