सेन्सेक्स 49 अंकांनी नुकसानीत, निफ्टीही प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ात मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व निफ्टी याचा प्रवास घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवर कामगिरीमध्ये मिळताजुळता कल राहिल्याचे दिसून आले. दररोजच्या वापारातील साहित्याची निर्मिती करणाऱया कंपन्या, आयटी व बँक यांच्या समभागातील विक्रीच्या प्रभावामुळे भारतीय बाजारात नकारात्मक स्थिती राहिली होती.
मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स काहीवेळ जवळपास 320 अंकांपर्यंत वधारल्याचे दिसून आले होते, परंतु अंतिमक्षणी मात्र सदरची तेजी गमावत सेन्सेक्स 48.99 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 59,196.99 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला अंतिम क्षणी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 10.20 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,655.60 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज फायनान्स आणि नेस्ले यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, एनटीपीसी, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग मात्र लाभासह बंद झाले आहेत.
आशियातील अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कम्पोझिट तेजीत तर हाँगकाँगचा हँगसेंग हा नुकसानीसह बंद झाला. युरोपियन बाजारात प्रमुख बाजार तेजीत राहिले असल्याचे दिसून आले.
जागतिक बाजारात मंगळवारच्या सत्रात मिळताजुळता कल राहिल्याच्या दरम्यान देशातील बाजारानी सुरुवातीची तेजी गमावत स्थिर स्थिती प्राप्त केली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 2.37 टक्क्यांनी घसरुन 93.47 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. मागील काही दिवसांपासून जागतिक पातळीवरील स्थितीचा प्रभाव हा भारतीय बाजारावर राहिला आहे. यामुळे भारतीय बाजारात गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.