इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानचा स्टार डावखुरा जलद गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे पीसीबीने शनिवारी जाहीर केले. शाहिन आफ्रिदी आशिया चषकाबरोबरच इंग्लंडविरुद्ध मायदेशातील मालिकेत देखील खेळू शकणार नाही. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडच्या भूमीत आयोजित तिरंगी मालिकेत त्याचे पुनरागमन अपेक्षित असल्याचे पीसीबीने म्हटले आहे. शाहिनला श्रीलंकेविरुद्ध गॅले येथील पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करत असताना उजव्या गुडघ्याची दुखापत झाली होती.
‘मी शाहिनशी स्वतः संवाद साधला असून त्याला दुखापतीच्या स्वरुपाची कल्पना दिली. आशिया चषक स्पर्धेत खेळता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर तो निराश होणे साहजिक होते. आता दुखापतीतून सावरण्यावर तो पूर्ण लक्ष केंद्रित करेल’, असे पीसीबीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नजिबुल्लाह यांनी नमूद केले.
आशिया चषक स्पर्धेत शाहिनऐवजी पर्यायी खेळाडूची घोषणा लवकरच केली जाणे अपेक्षित आहे. पाकिस्तानचा संघ सध्या रॉटरडममध्ये असून सोमवारी त्यांचे दुबईत आगमन होईल. यंदाची आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये दि. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत होत असून भारतीय संघ 7 जेतेपदासह या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
यंदाची आशिया चषक स्पर्धा टी-20 प्रकारात खेळवली जाणार आहे. भारत, पाकिस्तान, एक पात्रता संघाचा अ गटात तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान यांचा ब गटात समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत दोन्ही प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध लढेल आणि दोन्ही गटातील पहिले दोन अव्वल संघ सुपर-4 फेरीत पोहोचतील. त्यानंतर सुपर-4 फेरीतील सामन्यांअखेर 2 अव्वल संघ फायनलमध्ये पोहोचणार आहेत.