पुणे / वार्ताहर :
शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 जणांना तब्बल 5 कोटींचा गंडा घालणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (रा. पाषाण) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यासह भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक असून त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक पदावर नोकरी मिळवायची होती. त्यासाठी ते विविध ठिकाणी माहिती घेत असताना जून 2019 मध्ये सूर्यवंशी यांची भेट आरोपी दादासाहेब दराडे याच्याशी झाली. त्याने सूर्यवंशीला आपली बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी आहे. मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो, असे सांगितले. तसेच या कामासाठी आरोपी दादासाहेब याने सूर्यवंशी यांच्याकडून हडपसरमध्ये 27 लाख रुपये घेतले. मात्र, काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने सूर्यवंशी याने आरोपीला पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे परत न देता फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.