वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीला मोठे यश मिळाले आहे. राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी अरबिंदो फार्माचे व्यवस्थापकीय संचालक शरथ रेड्डी यांना माफीचा साक्षीदार करण्याची याचिका मंजूर केली आहे. न्यायालयाने रेड्डी यांना याप्रकरणी माफी दिली आहे. माझ्या जीवाला धोका असल्याचे रेड्डी यांनी न्यायालयाला सांगितले आहे. शरथ रेड्डीचा जबाब एका सीलबंद लिफाफ्यात सादर करण्यात आला आहे. मागील वर्षी 10 नोव्हेंबर रोजी शरथ रेड्डी यांना ईडीने अबकारी घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. तसेच विनय बाबू यांनाही अटक करण्यात आली होती. शरथ रेड्डी आता माफीचा साक्षीदार झाले आहेत. त्यांना आता याप्रकरणी शिक्षा होणार नाही. यापूर्वी मनीष सिसोदियांचे निकटवर्तीय दिनेश अरोरा देखील माफीचा साक्षीदार झाले होते. आपण साक्षीदार होण्यास तयार आहोत, याप्रकरणाच्या तपासात सीबीआयला पूर्ण सहकार्य करत आहोत, असे दिनेश अरोरा यांनी न्यायालयात एका याचिकेद्वारे म्हटले होते. 30 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने अबकारी घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. सिसोदिया यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. सिसोदिया हे साक्षीदारांना प्रभावित करू शकतात, यामुळे त्यांना सध्या जामीन दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्वत:च्या आदेशात नमूद केले होते.
अरोराने लाचेची रक्कम पोहोचविली
दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यानुसार आरोपी अमित अरोराने दिनेश अरोराच्या (सरकारी पक्षाचा साक्षीदार) माध्यमातून मनीष सिसोदियांपर्यंत लाचेची रक्कम पोहोचविली होती. सिसोदियांनी अबकारी धोरणात बदल करण्यासाठी लाचेच्या स्वरुपात मोठी रक्कम स्वीकारली होती असा आरोप आहे. सिसोदियांना पहिल्यांदा 1 कोटी रुपये देण्यात आले, त्यानंतर 2-3 महिन्यांमध्ये 12 कोटी रुपये देण्यात आले होते. या रकमेचा वापर गोव्यातील निवडणुकीसाठी करण्यात आला होता.