ऑनलाईन टीम / मुंबई :
अजित पवार गटाने सलग दोन दिवस शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची विनंती या गटाने पवारांना केली होती. मात्र, अजित पवार गटाचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. कारण शरद पवार आपली भूमिका बदलण्यास तयार नाहीत. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पवारांनी या गटाला ठणकावून सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
अजित पवार गटाने काल शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा हा गट पवारांच्या भेटीसाठी वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहचला होता. पक्ष एकसंघ राहावा म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची विनंती या गटाने शरद पवारांना केली होती. काल झालेल्या भेटीतही पवारांना हीच विनंती मंत्र्यांनी केली होती. मात्र, पवारांनी काल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज पुन्हा हीच विनंती करण्यात आल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे पवारांनी या गटाला ठणकावल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, बेंगळूर येथे विरोधी पक्षांच्या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला शरद पवार आज उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, उद्या ते बेंगळूरला या बैठकीसाठी जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.