पुणे / वार्ताहर :
पुण्यातील सदाशिव पेठेत चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून 5 लाख 19 हजार रुपये किंमतीचे 352 ग्रॅम चरस, तलवार, सत्तूर, कुकरी, कुऱ्हाड अशी धारधार शस्त्रे जप्त करण्यात आली.
सागर सुभाष मोडक (वय 43, रा. ऑर्चिड बिल्डींग, नातूबाग, 1367, सदाशिव पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोडक हा सदाशिव पेठेतील नातूबाग परिसरात चरसची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अनिकेत बाबर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून मोडक याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळच्या बॅगमध्ये 352 ग्रॅम चरस आढळून आले. त्याची बाजारातील किंमत 5 लाख 19 हजार रुपये आहे. यासह त्याच्या बॅगमधून तीन तलवारी, दोन कुकरी, एक सत्तूर, एक कुऱ्हाड, एक रापी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.