► प्रतिनिधी / बेळगाव
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे शहरात शौर्य यात्रा काढण्यात आली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून या यात्रेला प्रारंभ करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चालना देण्यात आली.
चन्नम्मा चौकात राणी चन्नम्मा मूर्तीला पुष्पहार अर्पण करून देशाप्रति घोषणा देण्यात आल्या. यानंतर सदर मिरवणूक काकतीवेस, शनिवारखूट मार्गे शहरातील महत्त्वाच्या गल्ल्यांमधून काढण्यात आली. हनुमान मूर्तीस्थित रथ या मिरवणुकीत सहभागी झाला होता. बजरंग दलचे कार्यकर्ते भगवे ध्वज, भगव्या पताका घेऊन मिरवणुकीत दुचाकीवरून सहभागी झाले होते. विश्व हिंदू परिषदेच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत कदम, कृष्णा भट्ट, आनंद कलिंगण्णावर, नागेश कांबळे, माजी नगरसेवक दीपक वाघेला, नगरसेवक श्रेयश नाकाडी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.