वृत्तसंस्था/ बोगोटा (कोलंबिया)
येथे सुरू असलेल्या विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेतून बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा अचिंता शेवुली याने येथे सुरू असलेल्या विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
सदर स्पर्धा सुरू होण्यास केवळ काही क्षण बाकी असताना शेवुलीला स्नायू दुखापतीची समस्या झाली. या दुखापतीमुळे त्याला सातत्याने वेदना होत असल्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय त्याने स्पर्धा आयोजकांना कळविला आहे. विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेत तो पुरुषांच्या विभागात 73 किलो वजनगटात भारताचे क गटातून प्रतिनिधित्व करणार होता. गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शेवुलीने सर्वोत्तम कामगिरी करताना स्नॅचमध्ये 143 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच त्याने या स्पर्धेत क्लिन आणि जर्कमध्ये 170 असे एकूण 313 किलो वजन उचलत दर्जेदार कामगिरी केली होती. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची ही पहिली पात्रतेची स्पर्धा आहे. प्रत्येक वजनगटातील प्रत्येक देशाच्या आघाडीच्या दहा वेटलिफ्टर्समधून एकाची निवड केली जाणार आहे. बोगोटामध्ये सुरू असलेल्या या विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या मिराबाई चानूने 49 किलो वजनगटात रौप्यपदक मिळविले आहे. मात्र, बिंदियाराणी देवीचे आव्हान संपुष्टात आले. तिला 25 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 61 किलो वजनगटात भारताच्या सी. ऋषिकांत सिंगला 22 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता 109 किलोवरील वजनगटात भारताचा गुरुदीपसिंग भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. बोगोटामधील ही विश्व वेटलिफ्ंिटग स्पर्धा 16 डिसेंबरला संपणार आहे.