फोंडा : फोंडा तालुक्यातील राज्यस्तरीय सार्वजनिक शिमगोत्सव मिरवणूक 8 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रोमटामेळ, चित्ररथ देखावे, लोकनृत्य व वेशभूषा अशा विविध स्पर्धा असतील. पर्यटन खाते व फोंडा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
फोंड्याचे पालकमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत काल रविवारी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये झालेल्या फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीच्या बैठकीत कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी व्यासपीठावर फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक आनंद नाईक, अंत्रुज शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक नाईक, सचिव गुरुनाथ उर्फ भाई नाईक व पदाधिकारी किशोर नाईक हे उपस्थित होते. बैठकीला उपस्थित अंत्रुज शिमगोत्सव समितीचे सदस्य तसेच लोककलाकार व शिमगोप्रेमींनी आयोजनासंबंधी विविध सूचना केल्या. कोरोनानंतर यंदा प्रथमच मुक्त वातावरणात हा शिमगोत्सव होत असल्याने आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात येणार आहे. सर्व स्पर्धांसाठी भव्य रक्कमेची पारितोषिके तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
5 मार्चला महालसा देवीला नमन
5 मार्च रोजी शिमगोत्सव समितीतर्फे म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीला नमन घालून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 8 मार्च रोजी फोंडा शहरातून भव्य शिमगोत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीची सुऊवात सायं. 4 वा. तिस्क-फोंडा येथून होईल व रात्री 10 वा. जुन्या बस स्थानकावर सांगता होणार आहे. रात्री उशिरापर्यंत ध्वनी क्षेपक लावण्यास निर्बंध असल्याने रात्री 10 वाजेपर्यंत मिरवणूक आटोपती घ्यावी लागेल. त्यामुळे रोमटामेळ, चित्ररथ व लोककला पथकांनी वेळेत उपस्थिती लावून शिमगोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मंत्री रवी नाईक यांनी यावेळी केले. स्पर्धांची बक्षिसे, आयोजन समिती व अन्य कार्यक्रम येत्या 17 फेब्रुवारी रोजी फोंडा पालिकेमध्ये होणाऱ्या पुढील बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे. फोंडा तालुक्यातील लोककलाकार, समितीचे सदस्य तसेच शिगमोप्रेमींनी या बैठकीला मोठ्यासंख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन अंत्रुज शिगमोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.