बुधवारी शहरातून निघणार भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक : मंडळांकडून जय्यत तयारी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व परिसरात सोमवार दि. 2 पासून परंपरेनुसार होणाऱया शिवजयंतीला सुरुवात होणार आहे. मागील दोन वर्षांत शिवजयंती झाली नसल्याने यावषी मोठय़ा जल्लोशात व उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यासाठी मंडळांनी तयारी केली आहे. सोमवारी शिवजयंती साजरी होणार असून बुधवार दि. 4 रोजी शहरातून भव्य अशी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे.
बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रापेक्षा भव्य अशी शिवजयंती बेळगावमध्ये होत असल्याने आसपासच्या भागातील शिवभक्त मोठय़ा संख्येने बेळगावमध्ये दाखल होत असतात. काही मंडळांचे पदाधिकारी महाराष्ट्रातील विविध गडकोटांना जाऊन तेथून शिवज्योत बेळगावमध्ये आणतात. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने सोमवार दि. 2 मे रोजी सकाळी 7 वा. धर्मवीर संभाजी चौक येथे शिवज्योतीचे स्वागत केले जाणार आहे. सकाळी 9 वा. नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केले जाणार आहे. सकाळी 10 वा. शहापूर येथील शिवाजी उद्यान येथे शिवमूर्तीला पुष्पहार व पूजन केले जाईल.
मुख्य मार्गांवरून चित्ररथ मिरवणूक
बुधवार दि. 4 रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी 6 वा. श्रींच्या पालखीचे पूजन करून नरगुंदकर भावे चौकातून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तेथून शहराच्या मुख्य मार्गांवरून चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. रविवार दि. 8 रोजी सकाळी 8 वा. येळ्ळूर येथून राजहंसगड चढणे व उतरणे ही स्पर्धा होणार आहे. शिवभक्तांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने केले आहे.
शहरात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
रमजान ईद, शिव-बसव जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बेळगावातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांचे पथसंचलन झाले. सण-उत्सवाच्या काळात शहराच्या शांततेला धक्का पोहोचू नये यासाठी पोलीस दलाने व्यापक तयारी केली असून या तयारीचाच एक भाग म्हणून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रविवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास राणी चन्नम्मा चौक परिसरातून पथसंचलनाला सुरुवात झाली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, खडेबाजाराचे एसीपी ए. चंद्राप्पा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी आदींसह शहरातील बहुतेक अधिकाऱयांनी या पथसंचलनात भाग घेतला होता.
काकतीवेस, शनिवार खूट, खंजर गल्ली, दरबार गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली, जुना पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशनमार्गे खडेबाजार, टेंगिनकेरी गल्ली, भेंडीबाजार, आझाद गल्ली, पिंपळकट्टा, कंबळी खूटहून मारुती गल्लीपर्यंत पथसंचलन पोहोचले.
नागरी पोलीस, राज्य राखीव दलाचे जवान पथसंचलनात सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी आतापर्यंत पोलीस स्थानकनिहाय बैठका घेण्यात आल्या आहेत. शांतता समिती व शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या पुढाकारातून व्यापक बंदोबस्त तैनात करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.