वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जॉर्डनमधील अमन येथे सुरू असलेल्या आशियाई पुरुष आणि महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या विभागात भारताचा अनुभवी मुष्टीयोद्धा शिवा थापाने 63.5 किलो गटात रौप्यपदक मिळवले. दुखापतीमुळे त्याने अंतिम लढत अर्धवट सोडल्यामुळे त्याचे सुवर्णपदक हुकले. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत एकूण 12 पदकांची कमाई केली आहे.
28 वर्षीय शिवा थापा हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी पुरुष मुष्टीयोद्धा म्हणून ओळखला जातो. शनिवारी 63.5 किलो वजन गटातील अंतिम लढत शिवा थापा आणि उझ्बेकचा रुसलेन यांच्यात आयोजित केली होती. या अंतिम लढतीतील पहिल्या फेरीत पहिल्या तीन मिनिटांमध्ये रुसलेनने थापावर 5-0 अशी आघाडी मिळवली होती. या लढतीच्या दुसऱया फेरीमध्ये थापाने रुसलेनला काही जबरदस्त ठोसे मारलेही पण याच दरम्यान त्याला दुखापत झाली. उजव्या गुडघ्यामधून त्याला वेदना जाणवू लागल्या. काही सेकंदातच त्याने ही अंतिम लढत अर्धवट सोडली. त्यामुळे रुसलेनला सुवर्णपदक मिळाले. शिवा थापाने या स्पर्धेत आतापर्यंत सहा पदके मिळवली होती. 2013 साली त्याने सुवर्ण, 2017, 2021 आणि 2022 साली त्याने या स्पर्धेत 3 रौप्यपदके तसेच 2015 आणि 2019 साली या स्पर्धेत त्याने दोन कास्यपदके मिळवली आहेत. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुष विभागात सर्वाधिक पदके मिळवणारा शिवा थापा हा पहिला भारतीय मुष्टीयोद्धा आहे. महिलांच्या विभागात भारताच्या एम. सी. मेरीकॉमने सात पदके तर एल. सरितादेवीने 8 पदके मिळवली आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील महिला स्पर्धकांनी एकूण 7 पदके तर पुरुष स्पर्धकांनी 5 पदकांची कमाई या स्पर्धेमध्ये 27 देशांचे स्पर्धक सहभागी झाले आहेत.
महिलांच्या विभागात टोकिया ऑलिम्पिक कास्यपदक विजेती लवलिना बोर्गेहेनने तसेच अल्फिया पठाण यांनी सुवर्णपदके मिळवली आहेत. स्वाती बोरा, परवीन हुडा, मिनाक्षी यांनी रौप्यपदके तर अनुक्षिता बोरो, प्रिती दाहिया यांनी कास्यपदके घेतली आहेत. पुरुषांच्या विभागात नरेंदर, सुमीत, मोहमदहुसामुद्दीन, गोविंद कुमार सहानी यांनी प्रत्येकी एक कास्यपदक मिळवले आहेत.