अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
वृत्तसंस्था / प्रयागराज
उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी परिसरातील श्रृंगारगौरी मंदिरात पूजाअर्चा करण्याचा अधिकार मागणारी हिंदू पक्षकारांनी सादर केलेली याचिका वैध असून त्यावर सुनावणी करावी, असा आदेश अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाने दिला आहे. ही याचिकच रद्द करावी ही मुस्लीम पक्षकारांची मागणी न्यायालयाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे हिंदू पक्षकारांनी सादर केलेल्या याचिकेवर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी पुढे सुरु राहणार ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.
साधारणत: 2 वर्षांपूर्वी ज्ञानवापी परिसरातील श्रृंगारगौरी मंदिरात हिंदू महिलांना पूजापाठ आणि धार्मिक विधी करण्याची अनुमती दिली जावी, अशी मागणी करणारे आवेदनपत्र कनिष्ठ न्यायालयात पाच हिंदू महिलांनी सादर केले होते. त्यावर सुनावणी होऊन या परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश देण्यात आला होता. सर्वेक्षणात या परिसरातील तलावात एक शिवलिंग सापडले होते. ते पुरातन शिवलिंग आहे, असे हिंदू पक्षकारांचे प्रतिपादन होते, तर तो कारंजा आहे, असे मुस्लीम पक्षकारांचे म्हणणे होते. त्यानंतर हा वाद उच्च न्यायालयात पोहचला.
उच्च न्यायालयाचा निर्णय
मुस्लीम पक्षकारांनी उच्च न्यायालयात याचिका सादर करुन शिवलिंगाच्या शास्त्री सर्वेक्षण करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. तसेच हिंदू महिलांनी केलेल्या पूजापाठाच्या अधिकाराच्या मागणीचे आवेदनपत्र रद्द करावे अशीही मागणी त्यांनी केली होती. तथापि, अलाहाबाद उच्च न्यायालयाने या दोन्ही मागण्या फेटाळल्या आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 जुलैला होणार आहे.
संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण हवे
ज्ञानवापी परिसर हा पूर्वी हिंदू मंदिराचेच स्थान होता. नंतर मुस्लीम आक्रमकांनी तेथे मंदीर तोडून मशीद बांधली. त्यामुळे हे स्थान हिंदूंच्या आधीन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या परिसरातील तलावात आढळलेल्या शिवलिंगाचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्याचा आदेश यापूर्वीच दिला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली असून उन्हाळ्याच्या सुटीनंतर अंतिम सुनावणी होणार आहे. हिंदू पक्षकारांना आता अलाहाबाद उच्च न्यायालयात नवी याचिका सादर केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून, केवळ शिवलिंगच नव्हे, तर या संपूर्ण परिसराचेच शास्त्रीय सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयात आता 7 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.
हा ऐतिहासिक निर्णय
अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निर्णयाचे हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी स्वागत केले आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून मुस्लीम पक्षकारांच्या प्रयत्नांना धक्का देणारा हा निर्णय आहे. यामुळे, हिंदू पक्ष बळकट झाला असून आता मुख्य सुनावणीत पुरावे सादर केले जातील. आमच्या सर्व मागण्या सत्याधारित असल्याने त्या आम्ही सिद्ध करणार आहोत. श्रृंगारगौरी हे प्राचीन मंदीर आहे, अशी प्रतिक्रिया विष्णू शंकर जैन यांनी व्यक्त केली.